पिंपरी-चिंचवड

भटक्या कुत्र्यांवरून प्रशासन धारेवर

CD

पिंपरी, ता. २० ः भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि श्वानप्रेमींमुळे होणाऱ्या त्रासासह दिवसाआड होणारा अपुरा पाणीपुरवठा, रस्तोरस्ती कचऱ्याची समस्या, सांडपाणी वाहिन्या व चेंबरमुळे होणारी दुर्गंधी, वाहनतळाअभावी लावणाऱ्या वाहनांवरील वाहतूक पोलिसांची कारवाई, आदींबाबत पोटतिडकीने प्रश्‍न उपस्थित करीत नगरसदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
महापौर, उपमहापौर, पक्षनेते व विरोधी पक्षनेते निवडीनंतर सहा फेब्रुवारी रोजी तहकूब झालेली महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २०) पार पडली. त्यात स्थायी समिती आणि विविध विषय समिती सदस्य निवडीचा विषय होता. महापौर पीठासीन अधिकारी होते. आयुक्त श्रावण हर्डीकर व नगरसचिव मुकेश कोळप व्यासपीठावर होते.
प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी ‘गेल्या चार वर्षात प्रशासकीय काळात झालेल्या कारभारावर चर्चा व्हावी’, असा प्रस्ताव मांडला. त्यास राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. तसेच, श्वान दंश वाढले आहे, त्यावर पशुवैद्यकीय विभागाने काय उपाययोजना केल्या, याची माहिती मागितली. भटक्या कुत्र्यांनी आकुर्डीत एका मुलीला फरफटत नेले. प्राधिकरणात एका स्कूल बस चालकावर कुत्र्यांनी हल्ला केला. उद्यानांमध्ये भटकी कुत्री आहेत. त्यामुळे सर्वांनाच भिती वाटते. प्राधिकरणातील एक व्यक्ती कुत्र्यांना मांस खाऊ घालते. ते मिळाले नाहीतर कुत्री लहान मुलांवर हल्ले करतात. कुत्रे चालवल्यामुळे गेल्या वर्षभरात २८ हजार ९९ जणांनी उपचार घेतल्याचे रुग्णालयांतील आकडेवारी सांगते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा. पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्यावर कारवाई करावी. श्वान दंश हा विषय गांभीर्याने घ्यावा, असे मुद्देही मिसाळ यांनी उपस्थित केले. त्यांनी खेळण्यातील कुत्रे आयुक्तांना भेट दिले. त्यानंतर सर्वच नगरसेवक, नगरसेविकांनी आपापल्या भागातील विविध समस्या मांडल्या.

चर्चेत सहभाग ः
नीलेश बारणे, वर्षा जगताप, ऐश्वर्या तरस, शेखर चिंचवडे, आशा सूर्यवंशी, संदीप कस्पटे, योगिता बारणे, उत्तम केंदळे, कुंदन गायकवाड, नीलेश तरस, राहुल जाधव, हिराबाई घुले, कैलास कुटे, उदय गायकवाड, यश साने, मनीषा पवार, श्याम जगताप, अनुराधा गोरखे, रवीना अंघोळकर, आरती चौंधे, बाबासाहेब त्रिभुवन, नीता पाडळे, जितेंद्र ननावरे, विनोद नढे, शशिकांत कदम, नितीन काळजे

कोण काय म्हणाले.
वैशाली घोडेकर ः कुत्र्यांसाठी एखादी जागा निश्चित करून त्यांची देखभाल करावी
डॉ. सुहास कांबळे : प्रत्येक प्रभागात पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा
योगेश बहल ः महापालिकेचे उत्पन्न स्रोत वाढवावेत
शैलजा मोरे ः एमएनजीएल गॅस जोड घेण्याबाबत मनमानी सुरू आहे
धर्मपाल तंतरपाळे : श्वानप्रेमी नागरिकांकडून मारहाण होते केली जात आहे
उज्ज्वला ढोरे ः पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा महिला रस्त्यावर उतरतील
विश्वजित बारणे ः रावेत बंधाऱ्यातील पाणी पिण्यास योग्य नसल्याने शिवणेतील बंधाऱ्यातून घ्यावे
संगीता ताम्हाणे ः जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्या बदलून हव्यात
वैशाली काळभोर ः पुणे-मुंबई महामार्ग सेवा रस्त्यांचे डांबरीकरण करावे
प्रमोद कुटे ः वाहनतळांची व्यवस्था होईपर्यंत वाहनांवर कारवाई करू नये
अपर्णा डोके ः कुत्रे, डुकरे, घुशी व पारव्यांचा बंदोबस्त करावा
संदीप वाघेरे ः २०१७ पासून आतापर्यंतच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा
तुषार हिंगे ः शहरात क्रीडा विद्यापीठ सुरू करावे
स्वाती काटे ः आम्ही रात्री जागून पाणी भरतो, तेही गढूळ असल्याने प्यावेसे वाटत नाही
कुणाल वाव्हळकर ः माता रमाबाई आंबेडकर स्मारक उभारावे
निकिता कदम ः मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
पंकज भालेकर ः जैवविविधता प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे
राजू बनसोडे : दापोडी वाळीत टाकल्यासारखे आहे
विकास साने ः देहू-आळंदी रस्त्यावर तळवडे कॅनबे चौक ते डुडुळगावपर्यंत उड्डाणपूल असावा
संजय काटे ः बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर निर्बंध आणावेत

अशाही प्रमुख मागण्या
- मैलापाणी वाहक वाहनांची संख्या वाढवावी
- गणेश तलावातील गाळ काढून पाणी पातळी वाढवावी
- हवा प्रदूषण रोखण्याची व्यवस्था करावी
- मुळशी धरणातून पाणी आणावे
- हाॅकर्स झोन करावेत
- शहर स्वच्छतेचे रात्री महिलांकडून केले जाणारे काम बंद करावे
- अपघात रोखण्यासाठी टॅंकर, ट्रक, बस यांवर दिवसा निर्बंध घाला
- बंद सीसीटीव्ही कॅमेरे, सारथी यंत्रणा सुरू करावी
- संभाजी महाराज पुतळा उभारण्याचे बजेट का वाढले, याची चौकशी व्हावी
- संतश्रृष्टी येथे सुरक्षारक्षक नेमावेत
- शहराच्या बकालपणास जबाबदारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
- पवना नदीकाठी डुकरे पाळण्यांवर कारवाई व्हावी
- दवाखान्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे
- क्रीडांगणे व मैदानांसाठीच्या आरक्षणांवरील अतिक्रमणे हटवावीत
- ताथवडेत ताब्यात नसलेल्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाची चौकशी व्हावी
- पाण्याचे ऑडिट करावे
- भामा आसखेड पाणी योजनेच्या कामास विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी
- चऱ्होलीतील टीडीआर गैरव्यवहाराची चौकशी व्हावी
- निवासी क्षेत्रात कुत्री पाळण्याबाबत धोरण आखावे

सुलभा उबाळे (शिवसेना) ः प्रशासकीय काळातील कामांची श्वेतपत्रिका काढावी. अधिकाऱ्यांनी महापालिकेला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. माझ्या सासऱ्यांसह आठ जणांना पिसाळलेले कुत्रे चालविले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात शेल्टर उभारा. कुत्रे, पाणी, ड्रेनेज, स्मार्ट सिटी आदींबाबत निर्णय घ्या. सेक्टर २२ मधील नागरिकांना शौचास उघड्यावर जावे लागते. अधिकाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्ती अर्ज श्वेतपत्रिका निघेपर्यंत मंजूर करू नका. श्वानप्रेमींमुळे सोसायट्या रिकाम्या होत आहेत. श्वानप्रेमींनाही शेल्टरमध्ये ठेवा.

राहुल कलाटे (भाजप) ः आज सकाळी वाकडच्या भुजबळ वस्तीत चार पाच जणांना कुत्रे चावले. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. दररोज पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सर्व प्रभागांसाठी बजेट द्यावे. नवीन आलेला अधिकारी इथे फक्त कमविण्याचा प्रयत्न करतोय. पैशांशिवाय फाइल पुढे जात नाही. सोसायट्यांचे क्लब हाऊस, उद्यानांना लावलेला कर प्रशासनाने कमी करावा. प्रभागात नगरसेवकांनी सुचवलेली कामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य लाभले पाहिजे. आयुक्तांचा प्रशासनावर वचक असावा.

भाऊसाहेब भोईर (विरोधी पक्षनेते) ः चार हजार कोटी सल्लागारांवर खर्च झालेत. २०१७ पासूनच्या कामांची चौकशी करावी. चार वर्षात प्रशासनाला आलेली सूज आता उतरेल. अधिकाऱ्यांना भानावर आणले पाहिजे. मैलामिश्रित पाणी शुद्ध करून आपण पितोय. पन्नास महिला नगरसेविकांनी शाळा दत्तक घेऊन मुलींचे समुपदेशन करावे. कामांना विलंब करणाऱ्या ठेकेदारांना जाब विचारावा. नगरसेवकांनीही एकमेकांचा मान ठेवावा. अधिकारी व प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत, पण, आमच्या चाकाला खिळे ठोकू नका

प्रशांत शितोळे (पक्षनेते) ः गल्लीतल्या कुत्र्यांचा विषय सभागृहात मांडणे शहरासाठी भूषणावह नाही. शहराच्या बदनामीस प्रशासन जबाबदार आहे. अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही. चांगल्या कामांचे कौतुक आहे. लोक व प्रशासन यांतील दुवा असलेल्या नगरसेवकांना न जुमानण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची आहे. चुकीच्या पद्धतीने होणारी कामे खपवून घेणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. अधिकाऱ्यांनी टार्गेट ठेवले आहे, ‘इतके’ आज घरी घेऊन जाऊ. चुकीच्या कामांना समर्थन देणार नाही.

महापौर रवी लांडगे ः पाणी प्रश्‍नावर राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेतले जातील. भामा आसखेड धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी आणणाऱ्या योजनेस विलंब झाला आहे. त्या ठेकेदारास कमी करून नवीन ठेकेदारास काम दिले जाणार आहे. नगरसेवकांसह सामान्य नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणू. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने अजित सृष्टी साकारून महापालिकेच्या नवीन इमारतीस त्यांचे नाव दिले जाईल. त्यांचा पुतळा उभारून सभागृहात अजित पवारांसह दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तैलचित्र लावले जाईल. अग्निशामक अधिकाऱ्याचे अधिकार काढून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले जातील. श्वानवाहक वाहने व केंद्र उभारले जातील. रात्री महिलांकडून होणारे रस्ते सफाईचे काम बंद केले जाईल.

...

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT