गांजा बाळगल्याप्रकरणी
चिखलीत एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिखलीतील पवार वस्ती येथे करण्यात आली. क्यामुद्दीन उर्फ लड्डन अल्लाउद्दीन ईद्रीसी (रा. कुदळवाडी पुलाखाली, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पवारवस्ती येथील कुदळवाडी पुलाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यालगत आरोपी गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून १० हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
मोटार चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : खरेदी कराराने विकलेली मोटार दोन जणांनी चोरून नेली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. ऋषीकेश संतोष गांधी (रा. भोरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) व संकेत सुरेश नेहरकर (रा. येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मनोज रुपनारायण सोनकर (रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमत करून ऋषिकेश गांधी याच्या नावे असलेली मोटार फिर्यादी यांना पाच लाख १५ हजार रुपये किमतीला खरेदी करारनाम्यानुसार विकली. त्या मोटारीचा रीतसर ताबा फिर्यादीला दिला. त्यानंतर फिर्यादी यांनी ही मोटार त्यांच्या चुलत भावाच्या पिंपळे सौदागर येथील पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती. त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख असा एकूण साडेपाच लाखाचा ऐवज होता. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांच्या परस्पर दुसऱ्या चावीने मोटार सुरु करून चोरून घेऊन गेले.
चिखलीत एकावर तलवारीने वार
पिंपरी : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना चिखलीतील कुदळवाडी येथे घडली. सादाब मुन्नाखान असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अब्दुल मुस्तकी मक्या मुददीन शहा (रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समशेद अली (रा. सानेचौक, चिखली) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा साडू समशेद अली हा फिर्यादीच्या नातेवाईक महिलेला फोन करीत असल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याने फिर्यादीला साने चौक येथे बोलावून घेत शिवीगाळ, दमदाटी करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रात्री फिर्यादी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह कुदळवाडी येथे असताना फिर्यादीचा साडू समशेद अली व इतर आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीचे मित्र सादाब मुन्नाखान हे वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर समशेद अली याने तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.
जुन्या भांडणाच्या रागातून तिघांना मारहाण
पिंपरी : जुन्या वादातून चौघांनी मिळून तिघांना मारहाण केली. ही घटना चिंचवड, पत्राशेड येथे घडली. या प्रकरणी श्याम त्र्यंबक साळवे (रा. पत्राशेड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय शेलार, मुन्ना खैरारिया, आकाश उनवणे व एकजण (सर्व रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मुलगा रोहित हे त्यांच्या घराजवळ बोलत उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी अजय शेलार याने जुन्या भांडणाचा रागातून फिर्यादीचा मुलगा रोहित यास शिवीगाळ केली. दरम्यान, फिर्यादीने त्यास शिवीगाळ का करतोस, अशी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीचा मुलगा व दाजी हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना इतर आरोपींनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जुगार प्रकरणी पाच जणांवर कारवाई
पिंपरी : सार्वजनिक जागेत जुगार खेळल्याप्रकरणी पाच जणांवर चिंचवड गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चिंचवड, बिजलीनगर येथे करण्यात आली. प्रमोद नागनाथ साठे, मच्छिंद्र एकनाथ कांबळे, माणिक सीताराम गुंजाळ, आनंद तुकाराम थोरात व जुगार चालक शिरसाठ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बिजलीनगर येथील एका हॉटेलच्या मागील सार्वजनिक मोकळ्या जागेत आरोपी जुगार खेळत होते. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून जुगार साहित्य व साडेचार हजार रुपयांची रोख जप्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.