पिंपरी, ता. २१ ः आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात काय परिणाम होऊ शकतो ? याचा अभ्यास करणार आहोत. त्यादृष्टीने राज्यातील उद्योग जगतासाठी देशामधील पहिले ‘एआय’ धोरण पुढील तीन ते चार महिन्यांत निश्चित केले जाईल’’, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता.२१) पत्रकार परिषदेत दिली.
तसेच ‘एआय’वर आधारित काही अभ्यासक्रमही तयार केले जातील, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. त्यावेळी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, पर्यावरण विभाग यांनी एकत्र येत दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा नदी सुधार आराखडा बनविला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. इंद्रायणी आणि पवना नदी शुद्धीकरण प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला देखील लवकरच मान्यता मिळेल. नदीत रसायनयुक्त पाणी सोडले जाऊ नये म्हणून सामायिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्रासाठी भोसरी एमआयडीसीतील जागेची निवड केली होती. ती जागा एमआयडीसीसाठी सोईस्कर होती. मात्र, नागरिकांच्या दृष्टीने ती सोईस्कर नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे एसटीपी व सीईटीपी प्रकल्प राबवताना लोकांना त्याचा त्रास होणार नाही, अशी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत जागेचा प्रश्न सुटेल, असेही सामंत यांनी सांगितले.
हिंजवडी पुलाचा ‘डीपीआर’
हिंजवडी येथील उड्डाणपुलात नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव होता. त्यांनतर अजित पवार यांनी एमआयडीसी, पीएमआरडीए आणि इतर विभागांची एकत्रित बैठक घेऊन तो ‘टीडीआर’मध्ये रुपांतरीत केला. त्यामुळे उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. त्यासाठी साडेसहाशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम सुरू आहे.
अतिक्रमणे काढणार
नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका यांच्या निवडणुकीमुळे तीन ते चार महिन्यांपासून आचार संहिता सुरू होती. पण, आता ती संपली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले आहेत. अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक कोंडी होत असेल, तर ती अतिक्रमणे काढण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
शिंदे यांना नगरसेवक भेटणार
महापालिकेची तिजोरीत खडखडाट आहे. अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांची नवनिर्वाचित नगरसेवकांनी वेळ मागितली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत नगरसेवकांबरोबर एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.