पिंपरी, ता. २२ : सध्याच्या डिजिटल युगात समाज माध्यमांचा प्रभाव वाढला असून तरुणाईसह सर्वच वयोगटांतील नागरिक विविध ‘प्लॅटफॉर्म’वर सक्रिय झाले आहेत. ‘रील्स’ हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला आहे. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता अनेक जण आता रील्सच्या माध्यमातून जबाबदार नागरिक बनू लागले आहेत. विविध प्रकारचे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक तरुण-तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत सामाजिक विषयांवर छोटे व्हिडिओ तयार करत आहेत. आई-वडील, आई-वडील व मुले, आजी-आजोबा, भाऊ-बहीण यांच्यासोबत तयार केलेल्या व्हिडिओंमुळे संदेश अधिक प्रभावी ठरत आहे. कौटुंबिक नातेसंबंध, ज्येष्ठांचा सन्मान, मुलींचे शिक्षण, व्यसनमुक्ती, घरगुती नाते संबंध, सायबर फसवणूक यांसारख्या विषयांवर सोप्या भाषेत संदेश दिले जात आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढत असून समाजात सकारात्मक विचारांची पेरणी होत आहे. रील्स हे केवळ करमणुकीचे साधन न राहता समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनू लागले आहे. कुटुंबाच्या सहभागातून दिले जाणारे सकारात्मक संदेश समाजात जागरूकता निर्माण करत असून डिजिटल माध्यमाचा वापर कसा विधायक पद्धतीने करावा, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
अल्पावधीत प्रभावी संदेश
रील्सचा कालावधी कमी असल्याने मुद्देसूद आणि प्रभावी संदेश देणे आवश्यक असते. त्यामुळे संवादकौशल्य आणि मांडणी यांना विशेष महत्त्व आले आहे. काही स्थानिक कंटेंट क्रिएटर्स नियमितपणे सामाजिक विषयांवर काम करीत आहेत. महिलांच्या सुरक्षेपासून ते रस्ता सुरक्षेपर्यंत विविध विषयांवर सातत्याने पोस्ट केल्या जात आहेत.
समाज हिताचे संदेश
समाज माध्यमांचा प्रभाव तरुणांवर अधिक असल्याने त्याद्वारे दिले जाणारे संदेश जबाबदारीने देणे गरजेचे आहे. चुकीची माहिती, आक्षेपार्ह सामग्री किंवा केवळ प्रसिद्धीसाठी केलेली अतिरेकी कृत्ये टाळणे आवश्यक आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सपेक्षा आशयपूर्ण व समाजहिताचा संदेश महत्त्वाचा ठरतो.
प्रशासन, संस्थांचा सहभाग
काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही आता रील्सच्या माध्यमातून मोहिमा राबवत आहेत. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, मतदान जनजागृती, महिला सक्षमीकरण यांसारख्या उपक्रमांची माहिती आकर्षक पद्धतीने दिली जात आहे. त्यामुळे युवकांचा सहभाग वाढताना दिसत आहे.
आम्ही कुटुंबीयांसमवेत वेळोवेळी सामाजिक संदेश देणारे रील्स बनवित असतो. आई-वडिलांचा सांभाळ, ज्येष्ठांचा आदर, कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम यासह इतरही सामाजिक विषयांचा समावेश असतो. त्यातून समाजात जनजागृती होण्यास मदत होते.
- एक तरुण
सध्या समाज माध्यमांचा अनेकजण वापर करत आहेत. रील्स बनविण्याचे प्रमाणही अधिक आहे. रील्स हे समाजात जनजागृती करण्याचे चांगले माध्यम आहे. मात्र, रील्स बनविताना योग्य खबरदारी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रील्सचा कन्टेन्ट योग्य असावा, याची काळजी घ्यावी.
- रवीकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.