पिंपरी : थेरगावमधील पवारनगर येथे एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत काळेवाडी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शैलेश मेदनीकांत शर्मा (रा. रसिकवाडी, जांबे, मुळशी), अशोक सोनाजी वडमारे (रा. पवारनगर, थेरगाव), संजय मच्छिंद्र मिसाळ (रा. म्हातोबानगर), शकुर नझीर हवालदार (रा. तापकीरमळा, काळेवाडी), अक्रम दिलदार खान (रा. काळेवाडी फाटा, थेरगाव) आणि जागा मालक दुर्गाराम रुपाराम पटेल (रा. पवारनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पवारनगर येथे एका खोलीत हे आरोपी जुगार खेळत होते. पोलिसांनी तिथे छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुर्गाराम पटेल याने आरोपींना जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला
पिंपरी : पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथे घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. महेंद्र सोपान कांबळे (रा. येळवंडे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र हा दारूच्या नशेत त्यांच्या मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत होता. त्यांची भांडणे सोडवण्यासाठी पत्नी मध्ये गेल्या असता, महेंद्रला त्याचा राग आला. त्याने भाजी कापण्याचा चाकू पत्नीच्या पोटात भोसकला. यात पत्नी गंभीर जखमी झाली.
वाकडमध्ये रिक्षाचालकाला रॉडने बेदम मारहाण
पिंपरी : रिक्षा आणि मोटारीचा अपघात झाल्यानंतर झालेल्या वादात मोटार चालकाने रिक्षा चालकाला रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना वाकडमधील भूमकर चौक पुलाजवळ घडली. या प्रकरणी रिक्षाचालक विशाल पंढरीनाथ जाधव (रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटारचालक संभाजी किसन सकपाळ (रा. मॅजिस्टिक सोसायटी, वाकड) याला अटक केली आहे. फिर्यादी यांची रिक्षा आणि आरोपीची मोटार यांचा अपघात झाला होता. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली. तसेच जवळ असलेल्या रॉडने फिर्यादीच्या हातावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली.
गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एका महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तिच्याकडून आठ हजारांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरीतील गांधीनगर येथे करण्यात आली. या प्रकरणात महिलेला अटक केली असून, तिचा पती कालिचरण तामचीकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गांधीनगर येथे एक महिला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे ७ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा सापडला. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता हा गांजा तिचा पती कालिचरण याने विक्रीसाठी दिल्याचे तिने सांगितले.
जुगार प्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : देहूरोडमधील श्रीकृष्ण नगर येथे बेकायदारित्या जुगार खेळणाऱ्या चौघांवर देहूरोड पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. दीपक रोहिदास अवचारी (रा. दांगटवस्ती, विकासनगर), दत्तात्रेय औदुंबर शिंदे (रा. श्री कृष्णनगर, देहूरोड), प्रवीण सुभाष कन्हेरे (रा. शितळानगर, मामुर्डी) आणि आमिन इस्माईल शेख (रा. गांधीनगर, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. श्रीकृष्ण नगरमधील सार्वजनिक ठिकाणी हे आरोपी जुगार खेळत होते. येथून पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.