पिंपरी, ता. २२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता.२२) शांततेत पार पडली. शहरातील ७४ केंद्रांमधून १४ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर, ६७७ विद्यार्थी गैरहजर राहिले. इयत्ता पाचवीचे ९५.७६ टक्के, तर इयत्ता आठवीचे ९५.४४ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
महापालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळांतील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मराठी, इंग्लिश, हिंदी व उर्दू या चार माध्यमांतून परीक्षा घेण्यात आली. शहरात ४४ केद्रांतून इयत्ता पाचवीच्या नऊ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. प्रत्यक्षात नऊ हजार १३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४०५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. तर ३० केंद्रात इयत्ता आठवीच्या पाच हजार ९६८ पैकी पाच हजार ६९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २७२ मुले गैरहजर राहिली. या परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात आले. पहिला पेपर प्रथम भाषा व गणित असून सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत झाला व दुसरा पेपर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत झाला. परीक्षेसाठी ७४ केंद्र संचालक, १२ सह केंद्रसंचालक, ७६५ पर्यवेक्षक व १९९ शिपाई यांची नेमणूक करण्यात आली. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथके तैनात होती. तर, अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.