पिंपरी, ता. २६ : डंपर, ट्रकमधून प्रमाणापेक्षा जास्त साहित्यांची वाहतूक केली जाते. त्या वाहनांतून रस्त्यावर खडी पडते. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होतात. तसेच हवेत उडणारी धूळ, बांधकाम साहित्य किंवा संबंधित अवजड वाहनांमुळे धूळ डोळ्यांत उडून अपघाताच्या घटना असे प्रसंग शहरासह उपनगरांत नेहमीचेच झाले आहेत.
बांधकामांशी संबंधित अवजड वाहने शहराच्या विविध भागांत सुसाट धावताना दिसतात. अशीच स्थिती दुचाकीला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून धावणाऱ्या दुचाकींबाबत दिसून दिसते. सायलेन्सरमधून कानठळ्या बसविणारा आवाज काढून ध्वनिप्रदूषण केले जाते.
मागील वर्षभरात नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावणाऱ्या एक लाख सात हजार ३९६ अवजड वाहनांवर तर नियमबाह्य सायलेन्सर बसविलेल्या १४ हजार ५१२ दुचाकीवर कारवाई केल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सांगितले जात आहे. बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले, तरी अशी वाहने राजरोसपणे शहरातील रस्त्यावरून धावत असल्याने पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या भागांत धावतात अवजड वाहने
हिंजवडी, वाकड, बावधन, रावेत, पुनावळे, ताथवडे, चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, आळंदी या भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. तसेच ‘आरएमसी प्लांट’देखील सुरू आहेत. त्यामुळे या भागांत मोठ्या प्रमाणात अवजड वाहने धावत असतात.
वेळेच्या मर्यादेचेही उल्लंघन
पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध मार्गांवर गर्दीच्या वेळी जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. यासाठी वेळही निश्चित करून देण्यात आली आहे. तळवडे, देहूगाव, चिखली, आकुर्डी, भोसरी, वाकड, हिंजवडी, बालेवाडी, सांगवी, ताथवडे, बावधन, पिंपरी, देहूरोड, चाकण या भागांतील काही मार्गांवर सकाळी आठ ते दुपारी बारा तसेच सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. तसेच आळंदी परिसरातील देहू फाटा ते चाकण चौक, वडगाव चौक, मरकळ चौक, धानोरी फाटा या मार्गावर सकाळी सात ते रात्री दहा वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीही वेळेचे पालन न करता ही अवजड वाहने दिवसभरात कधीही धावत असल्याचे दिसून येते.
ध्वनिप्रदूषण अन् अपघाताचाही धोका
वाहनांचे मूळ भाग बदलून नवीन बसवणे नियमबाह्य आहे. तरीही, काही दुचाकीचालक सायलेन्सरच्या रचनेत बदल करतात. किंवा मोठा आवाज यावा, अशी यंत्रणा बसवतात. शहरात बऱ्याचदा फटाक्यासारखा आवाज येणाऱ्या दुचाकी दिसतात. यामुळे ध्वनिप्रदूषण होते. तसेच दुचाकी चालकाने सायलेन्सरमधून अचानक मोठा आवाज निर्माण केल्यास शेजारील इतर दुचाकीचालक गोंधळतात. यामुळे त्यांचे नियंत्रण सुटून अपघाताचा धोका वाढतो. पादचाऱ्यांबाबतही असेच घडते.
मागील वर्षभरात पोलिसांनी केलेली कारवाई
महिना अवजड वाहने नियमबाह्य सायलेन्सर बसवलेल्या दुचाकी
जानेवारी १०,८३१ ६२४
फेब्रुवारी ८,६६९ १,१९८
मार्च ९,७८६ २,४७९
एप्रिल ७,१६३ १,३५२
मे ७,४२० ९४३
जून ६,८२४ ६९८
जुलै ७,४८२ ९९४
ऑगस्ट ८,६६७ १,०५६
सप्टेंबर ९,५२३ १,१९२
ऑक्टोबर ९,२०७ ७९८
नोव्हेंबर ७,९७१ १,१६४
डिसेंबर ८,२०९ १२९२
जानेवारी (२०२६) ५,६४४ ७२२
एकूण १,०७,३९६ १४,५१२
PNE26V99103
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.