पिंपरी, ता. २४ ः मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या ‘बेस्ट’, एमएमआरसी मेट्रो आणि पुणे मेट्रो नंतर आता राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू केली आहे. प्रत्येक सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थांनी वेगवेगळे कार्ड काढल्यामुळे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ योजनेचा बोजवारा उडाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांना वेगवेगळे कार्ड घ्यावे लागणार असल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांना सर्व ठिकाणी एकाच कार्डच्या माध्यमातून पैसे देता यावेत म्हणून केंद्र शासनाने ४ मार्च २०१९ रोजी ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ हे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) लॉन्च केले होते. हे डेबिट/प्रीपेड कार्ड मेट्रो, बस, उपनगरीय रेल्वे, पार्किंग आणि टोल यांसारख्या विविध ठिकाणी वापरता येत आहे. तसेच किरकोळ खरेदीसाठीही संपूर्ण देशात वापरता येते. महाराष्ट्रातही बेस्टने सर्वप्रथम २६ एप्रिल २०२२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘चलो कार्ड’ (एनसीएमसी) वितरित केले होते. मुंबई मेट्रोने ‘मुंबई वन’ (एनसीएमसी) कार्ड लॉन्च केले. हे कार्ड लोकल ट्रेन, मोनोरेल आणि बेस्टसह मेट्रोत वापरता येत आहे. पुण्यातही मेट्रो प्रशासनाने २०२३ मध्ये ‘एक पुणे’ कार्ड (एनसीएमसी) लॉन्च केले. आता एसटी महामंडळाने एनसीएमसी प्रणाली लागू केली असून, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. केंद्र शासनाचे ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ असतानाही राज्यातील विविध सार्वजनिक वाहतूक सुविधा देणाऱ्या संस्थांनी स्वतःचे ‘एनसीएमसी’ कार्ड सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांना मेट्रो, बेस्ट, पीएमपीएमएल, एसटी आणि इतर जिल्ह्यांतील सार्वजनिक बस सुविधा देणाऱ्या संस्थेचे वेगवेगळे कार्ड घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक कार्डची किंमतही वेगवेगळी आहे. तसेच नागरिकांना वेगवेगळे कार्ड सोबत बाळगावे लागणार आहे.
संस्था - कार्ड - किंमत
बेस्ट - चलो कार्ड - १००
एमएमआरसी मेट्रो - मुंबई वन - १००
पुणे मेट्रो - एक पुणे - ११८
एसटी - एनसीएमसी - १९९
‘‘पुणे मेट्रोने प्रवाशांना कॅशलेस प्रवास करता यावा म्हणून एनसीएमसी कार्ड सुरू केले आहे. जोपर्यंत सर्व कार्ड इंटिग्रेशन (एकत्रीकरण) होत नाही, तोपर्यंत मेट्रोचे कार्ड एसटीत किंवा एसटीचे कार्ड मेट्रोत चालणार नाही.
- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो
‘‘इतर संस्थांचे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ एसटीत चालणार आहे. त्यामुळे एनसीएमसी कार्ड असणाऱ्यांना वेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही.
- रोहन देसाई, सहायक जनसंपर्क अधिकारी, एसटी
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.