पिंपरी, ता. २४ : महापालिकेच्या स्थायी समितीपाठोपाठ अन्य विषय समिती अध्यक्ष (सभापती) निवड प्रक्रिया कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी (ता.२५) दुपारी ३ ते ५ या वेळेत इच्छुक सदस्यांनी अर्ज दाखल करायचे असून सोमवारी (ता.२) सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत निवड प्रक्रिया होईल. दरम्यान, संख्याबळानुसार सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या सदस्याचीच वर्णी लागणार हे निश्चित आहे. मात्र, त्यासाठी भाजप कोणाला संधी देते? याची औपचारिकता बाकी आहे.
महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात. त्यांच्याकडे विविध विषय समित्यांनी मंजूर केलेले विषयही आर्थिक मान्यतेसाठी येत असतात. त्यानंतर संबंधित विषय सर्वसाधारण सभेकडे मान्यतेसाठी जातात. विषय समित्यांमध्ये विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक यांचा समावेश आहे. त्यांच्या सदस्यांची निवड शुक्रवारी (ता.२०) सर्वसाधारण सभेत झाली आहे. आता त्यांच्या अध्यक्षांची निवड होणे बाकी आहे. त्यासाठी नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांना कळविले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सर्व समित्यांच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती केली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम (दोन मार्च २०२६)
समिती / वेळ
विधी / सकाळी : ११.००
महिला व बालकल्याण / सकाळी ११.३०
शहर सुधारणा / दुपारी १२.००
क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक / दुपारी १२.३०
शिक्षण / दुपारी १.००
विषय समित्यांतील संख्याबळ
महापालिकेत विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्या आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार प्रत्येक विषय समिती सदस्यांची संख्या नऊ आहे. त्यात सभागृहातील संख्या बळानुसार प्रत्येक विषय समितीतील पक्षीय सदस्यांचा कोटा ठरला आहे. म्हणजेच, १२८ नगरसदस्यांमधील १४.२२ सदस्यांमागे एक विषय समिती सदस्य असा कोटा आहे. त्यानुसार एक पुरस्कृत अपक्षासह भाजपच्या ८५ सदस्यांमागे प्रत्येक विषय समितीत ५.९७ म्हणजे पूर्णांकात ६ आणि राष्ट्रवादीच्या ३७ सदस्यांमागे २.६० म्हणजे पूर्णांकात ३ सदस्य निश्चित झाले आहे. शिवसेनेचे सहाच नगरसेवक असल्याने त्यांना विषय समित्यांमध्ये स्थान मिळालेले नाही.
विषय समित्यांनिहाय भाजप सदस्य
विधी समिती : ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रृती डोळस, कुशाग्र कदम
शहर सुधारण : अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय काटे, डॉ. सुहास कांबळे, उत्तम केंदळे
क्रीडा-कला-साहित्य-सांस्कृतिक : कैलास कुटे, श्याम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे
शिक्षण : पल्लवी वाल्हेकर, श्रृती वाकडकर, रवीना अंघोळकर, कविता भोंगाळे, रिटा सानप, सारिका बोऱ्हाडे
महिला व बालकल्याण : पल्लवी जगताप, नीता पाडळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे