पिंपरी, ता. २५ : पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांत हवा आणि ध्वनिप्रदूषण धोकादायक पातळी गाठली आहे. दिवसेंदिवस ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ढासळत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहे. भविष्यातील धोका ओळखून ‘सकाळ’ने प्रदूषणावर वृत्तमालिका सुरू केली आहे. याला वाचकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाचक त्यांच्या भावना ‘सकाळ’कडे व्यक्त करत आहेत. सरकारी यंत्रणा, राजकीय नेते, निष्काळजी नागरिकांबाबत नाराजी व्यक्त करत धोरणांवर टीका करत आहेत. ‘‘प्रदूषण रोखण्यासाठी आताच उपाय केले, तरच आपण टिकून राहू. अन्यथा ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरण्याची वेळ येईल,’’ अशी भीती वाचकांनी व्यक्त केली आहे.
हवा प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण केल्याबद्दल ‘सकाळ’चे मनःपूर्वक धन्यवाद. गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर आणि अनेक बेकायदेशीर बांधकामे झाली. त्यामुळे लोकसंख्या घनता, वाहनांची संख्या वाढली. पर्यायाने हवा व ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली. याचा थेट परिणाम जीवनमानावर होत आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर लवकरच आपल्याला ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन फिरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांवर कडक कारवाई, योग्य शहरी नियोजन आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन तातडीने आवश्यक आहे.
- शिव, नवी सांगवी
‘सकाळ’ने प्रदूषणासंदर्भात आवाज उठवला त्याबद्दल आभार. मी शहरात गेल्या वीस वर्षांपासून राहत आहे. आज प्रत्येक ठिकाणी जुन्या इमारती पाडून नवीन बांधकामे होत आहेत. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश येत नाही. नवीन बांधकाम करताना, जुनी झाडे सरसकट काढली जात आहेत. त्यामुळे वातावरणमध्ये प्रचंड प्रमाणात धुळीचे कण वाढले आहेत. जी झाडे उरली, त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात सिमेंटचे थर साचले आहेत. ‘झाडे लावा आणि जगवा ’ हे फक्त कागदावर आणि फोटोपुरते मर्यादित झाले आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवरील धूळ पसरत आहे. त्यामुळे रस्त्यावरून दुचाकी चालवणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे आहे.
- सुनील मगरे , चिंचवड
रावेत मध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रदूषण पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेच लहान मुलांना सतत खोकला, घसा दुखणे यांसारख्या समस्या होत असून वारंवार डॉक्टरांकडे जावे लागत आहे. वेगाने धावणाऱ्या रेडी-मिक्स काँक्रीट मिक्सर व ट्रकमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते. रात्री सुरू असलेली बांधकामे, बेकायदेशीर आणि नियम मोडणाऱ्या बांधकामांवर कारवाई होताना दिसत नाही. धूर सोडणाऱ्या वाहनांच्या चालक-मालकांवर कठोर कारवाई होत नाही. आमच्या परिसरात एकही उद्यान नाही. त्यामुळे हवा प्रदूषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.
- समाधान गायकवाड, रावेत
स्थानिक राजकारणी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने रहिवासी क्षेत्रांजवळ ‘आरएमसी प्लांट’ उभारण्यास परवानगी दिली. स्वच्छता आणि फवारणीचे कंत्राट राजकारण्यांना दिले आहे. ही मंडळी प्रदूषणाला हातभार लावत आहेत. खरं तर प्रदूषणाला पाठिंबा देत आहेत. पर्यावरणाची पर्वा न करता पैसे कमविण्याची इच्छा, असंख्य तक्रारी असूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. बांधकाम व्यावसायिकांच्या कामांचे नियमन करण्यात पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन अकार्यक्षम दिसते.
- एक वाचक
मोशी येथील सेक्टर १२ येथे ‘पीएमआरडीए’च्या जवळपास ५० रहिवासी इमारती आहेत. येथे जवळच असलेल्या एका कंपनीतून दररोज रात्री मोठ्या प्रमाणात काळा धूर हवेत सोडला जातो. त्याची दुर्गंधी येते. रसायनयुक्त सर्व धूर आमच्या सोसायट्यांकडे येतो. त्यामुळे येथील रहिवाशांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. प्रशासनाने त्वरीत यावर उपाययोजना कराव्यात.
- एक वाचक, मोशी
वैयक्तिकऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास प्रदूषण बऱ्याच अंशी टाळता येईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळू नये. वृक्षारोपण सर्वांत महत्त्वाचे कार्य आहे. असे कार्यक्रमात प्रशासनाने राबवून नागरिकांचे सहकार्य घेतले पाहिजे.
- प्रा. श्रीकांत आचोले, पिंपरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.