पिंपरी, ता. २५ : महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी (सभापती) बुधवारी (ता. २५) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल केले. त्यात केवळ भाजप सदस्यांचाच समावेश असल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागल्याचे निश्चित झाले. मात्र, निवड प्रक्रियेसाठी सोमवारी (ता.२) सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत आयोजित विशेष बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी करतील.
महापालिकेत स्थायी समितीसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, शिक्षण आणि क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्यांचाही समावेश आहे. त्यांच्या सदस्यांची निवड शुक्रवारी (ता.२०) सर्वसाधारण सभेत झाली आहे. आता अध्यक्षांची निवड होणे बाकी आहे. त्यासाठी नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांना कळविले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सर्व समित्यांच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २५) इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. निर्धारित वेळेत केवळ भाजपच्याच सदस्यांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. केवळ घोषणा बाकी आहे.
विषय समित्यांनिहाय अध्यक्ष
(अधिकृत घोषणा सोमवारी होईल)
समिती - अध्यक्ष
विधी - सुजाता बोराटे
महिला व बालकल्याण - राणी पठारे
शहर सुधाररणा - संजय काटे
क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक - कैलास कुटे
शिक्षण - रविना आंघोळकर
अशी होणार घोषणा
विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (ता. २) सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत विशेष सभा आयोजित केली आहे. त्याचे पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. कामकाज पाहणार आहेत. निर्धारित वेळेत प्रत्येक विषय समितीसाठी आलेल्या अर्जाची तपासणी पृथ्वीराज हे करतील. अर्ज वैध ठरल्यास ते अध्यक्षांच्या नावांची घोषणा करतील. अर्ज अवैध ठरल्यास निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी लागेल.
समित्यांमध्ये समतोल
पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. महापालिकेत स्थायी आणि विषय समित्या मिळून सहा समित्या आहेत. त्यांच्या अध्यक्षपदांवर तीनही मतदारसंघातील प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लावून भाजपने समतोल साधला आहे. यात पिंपरीतील संजय काटे, कैलास कुटे; चिंचवडमधील रविना आंघोळकर, अभिषेक बारणे (स्थायी) आणि भोसरीतील राणी पठारे, सुजाता बोराटे यांचा समावेश आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.