सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या पिंपरी चिंचवड (वल्लभनगर) आगारात ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत आहेत. नोंदणी खिडकी बंद, सर्व्हर डाऊन, कर्मचारी नाही अशी विविध कारणे प्रवाशांना दिली जात असून नागरिकांना नोंदणीसाठी आगारात हेलपाटे मारावे लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पारदर्शक आणि सोईस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ही प्रणाली लागू केली आहे. सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरु झाली आहे. एसटी महामंडळात ६५ ते ७५ वर्षे वयोगटासाठी ५०% सवलत, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास उपलब्ध आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. दिव्यांगासह विविध घटकांनाही एसटीत तिकीट दरात सवकवत देण्यात आलेली आहे. पण, आता यापुढे या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी एसटी आगारात प्रवाशांची गर्दी होत आहे. पण, नोंदणी करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी नोंदणी खिडकी बंद. त्यामुळे प्रवाशांना नोंदणी न करताच घरी जाव लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत आहे.
--------------
वल्लभनगर आगारात कार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मला काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की दोन दिवसांपासून ते कार्डासाठी हेलपाटे मारत आहेत. अद्याप त्यांचे कार्डचे काम झालेले नाही. विविध कारणे सांगून प्रवाशांना माघारी पाठवत आहेत. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- शामकांत खटावकर, ज्येष्ठ नागरिक
एनसीएमसी कार्ड वितरण करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी नोंदणी करत आहेत. तांत्रिक अडचणी असतील तर संबंधित कंपनीला सांगून ते दुरुस्त केले जाईल. स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांना योग्य नियोजन करुण नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.