कस्तुरी चौकात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
कस्तुरी चौक, हिंजवडी डांगे चौक रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसतात. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्यावरील कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा आणि येथे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच येथील पदपथावर झुडपे देखील वाढली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना येथून चालताना अडथळा निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने ही झुडपे काढून पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळा करून द्यावा.
- भूषण, वाकड
99956
दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
निगडी प्राधिकरणातील सिंधूनगर भागातील एलआयजी कॉलनीमधील सेक्टर २५ मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या जागेत असलेल्या सलूनमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलच्या वासामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. तसेच येथे जनरेटर देखील लावण्यात आले असून जनरेटरच्या सततच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात ज्येष्ठ नागरिक राहत असून त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या परिसराची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी.
- दत्त कुमार धामणस्कर, निगडी प्राधिकरण
99963
थेरगाव प्रभाग २३ मध्ये कचऱ्याचा ढीग
थेरगाव येथील प्रभाग क्र. २३ मधील कैलास मंगल कार्यालयाशेजारी व दिलीप वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमिच्या पाठीमागे काही नागरिक दररोज सकाळी व रात्री कचरा टाकतात. महापालिकेची घंटागाडी रोज येऊन कचरा नेते. तरी दररोज तेवढाच कचरा या ठिकाणी साचलेला असतो. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच येथील कचरा हटवून परिसर स्वच्छ करावा.
- साजिद मुल्ला, थेरगाव
99993
शाळकरी मुलांवर भटक्या श्वानांचा हल्ला
रहाटणी येथील कुणाल हॉटेल परिसरातील पदपथावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, नागरिक ये-जा करतात. येथून जाताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा भटक्या श्वानांनी चावा घेतला. या आठवड्यातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने त्वरित भटक्या श्वानांचा योग्य तो बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित पदपथ उपलब्ध करून द्यावे.
- महेश भोरे, रहाटणी
चेंबर खचल्याने अपघाताचा धोका
जीवन ज्योत हाॅस्पीटल समोर रहाटणी-पिंपळे सौदागर रस्त्यावरील चेंबर खचले आहे. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर सतत वर्दळ असते. महापालिकेच्या संबंधित विभागाने या चेंबरची तत्काळ दुरुस्ती करावी.
- शरद पाचणक, रहाटणी
99990
जुनी वाहनांचा अडथळा
संत तुकारामनगर येथील म्हाडाच्या एलआयजी वसाहत व संत तुकाराम महाराज मंदिरा मागे जुनी भंगार वाहने पडून आहेत. या वाहनांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने येथे खुरटे गवत उगवले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच डास देखील वाढले आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येची दखल घेऊन येथील वाहने हटवून परिसर स्वच्छ करावा.
- निशिकांत गोडबोले, संत तुकारामनगर
99992
भोंडवे बाग, रावेत परिसरात राडारोडा
भोंडवे बाग, रावेत जवळ महापालिकेने बांधकामाचा राडारोडा टाकण्यासाठी अधिकृत जागा निश्चित केली आहे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पाहता त्या ठिकाणी राडारोड्याबरोबर सर्वच प्रकारचा घरगुती कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्गंधीमुळे त्या भागातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच राडारोडा टाकण्याची जागा दुसरीकडे स्थलांतरित करावी. जेणेकरून परिसरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळेल.
- समाधान गायकवाड, रावेत
99989
जाहिरात फलकांमुळे परिसर विद्रूप
डांगे चौकातील उड्डाण पुलाचे खांब नुकतेच रंगविण्यात आले आहेत. परंतु जाहिरातदारांनी या खांबावर जाहिरातीचे फलक चिकटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या पुलाचे विद्रुपीकरण होत आहे. प्रशासनाने संबोधित जाहिरातदारांवर दंडात्मक कारवाई करून येथील जाहिरातीचे फलक हटवावेत.
- सचिन हवळ, डांगे चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.