इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचे भासवून
विवाहाच्या आमिषाने २७ लाखांचा गंडा
पिंपरी : विवाह संकेतस्थळावर खोटी ‘प्रोफाइल’ टाकून इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचे भासवत विवाहाच्या आमिषाने एका महिलेला २७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ताथवडेमधील पिडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आदर्श प्रशांत म्हात्रे ऊर्फ जयेश पाटील (रा. अलिबाग) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीने ऑनलाइन संपर्क साधून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने वेळोवेळी फिर्यादीकडून वेगवेगळी कारणे सांगत ४२ लाख ६४ हजार ३२ रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर गुन्हे संकेतस्थळावर तक्रार केली. त्यानंतर फिर्यादीला १६ लाख ६४ हजार ३२ रुपये फिर्यादीला परत मिळाले, मात्र आरोपीने उरलेले २७ लाख रुपये परत केले नाहीत.
-----------------
मोबाईल लिंक ओपन करताच
पावणे दोन लाख रुपये लंपास
पिंपरी : वाहतूक दंडाच्या बनावट मेसेजची लिंक मोबाईलवर पाठवून एका नागरिकाची सुमारे पावणे दोन लाख रुपयांना ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पिंपळे निलखमधील एका व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला मोबाईलवर ‘ट्रॅफिक फाईन’ संदर्भात मेसेज आला. लिंक ओपन करून ५०० रुपये भरण्याचा प्रयत्न करताच फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ८६ हजार रुपये काढून घेण्यात आले.
---------------------------
केकचे पैसे न देता कोयत्याने दहशत
पिंपरी : बेकरीमधून केक घेतल्यानंतर पैसे न देता तिघांनी बेकरी चालकाच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. पिंपळे सौदागर येथील जगताप नगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी नौशाद मुख्तार अहमद (रा. जगताप नगर, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य मानवतकर याला अटक केली असून अथर्व चव्हाण व यश दुर्गे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ‘आम्ही इथले भाई आहोत,’ असे सांगत आरोपींनी आरडाओरडा करीत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली.
----------------
स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी स्पा व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. मोशी प्राधिकरणात ही कारवाई करण्यात आली. राज संतोष जयस्वाल (रा. एनआयबीएम, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
-----------------
मारहाण प्रकरणी तिघांना अटक
पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. भोसरी एमआयडीसीमधील डक गार्डनमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी अभिजित तुकाराम तळपे (रा. एमआयडीसी भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांचे मित्र सिद्धेश प्रकाश ढोरे गप्पा मारत उभे होते. त्यावेळी ‘बघून का हसता’ असे म्हणत आरोपींनी मातीच्या पणत्या मारून त्यांना जखमी केले. प्रेम नवनाथ जाधव (रा. दिघी), स्वप्नील विलास खुने, आशिष बापू सरोदे (दोघेही रा. लांडेवाडी, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रणव ओव्हाळ (रा. संतनगर, मोशी) याच्यावर गुन्हा दाखल केला.
------------------------
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. पिंपरीतील एच. ए. मैदान परिसरात ही कारवाई करण्यात आली. पवन सचिन ससाणे (रा. गांधीनगर, पिंपरी) असे गुंडाचे नाव आहे. त्याला गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर २०२५ पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यानंतरही तो विनापरवानगी शहरात आला होता.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.