पिंपरी, ता. २५ ः सणासुदीच्या तोंडावर ड्रायफ्रूटच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बाजारांमध्ये अमेरिकन बदाम ८०० वरून एक हजार रुपये आणि इराणी ममरा बदाम दोन हजार चारशेवरून तीन हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. पिस्ताही दोन हजार चारशेवरून दोन हजार सातशे रुपये प्रति किलो झाला आहे.
भारतात विविध सणांनुसार वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचा वापर होतो. गणेश चतुर्थीत मोदकामध्ये काजू, मनुका आणि नारळ यांचा समावेश असतो. नवरात्री आणि उपवासाच्या दिवसांत बादाम, काजू, खजूर आणि अंजीर वापर होतो. दिवाळी हा ड्रायफ्रूट्ससाठी सर्वात मोठा हंगाम असतो. काजू कतली, बदाम बर्फी, ड्रायफ्रूट लाडू आणि मिश्र सुक्या मेव्यांचे बॉक्स भेट म्हणून दिले जातात. मात्र, काही दिवसांपासून बदाम आणि पिस्त्याची परदेशातून होणारी आयात कमी झाल्याने दर वाढले आहेत. त्यातच इराण आणि अफगाणिस्तान युद्धाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून, बाजारात बदामचे दर १०० ते १५० रुपये आणि पिस्ता २०० ते २५० रुपये प्रतिकिलो रुपयांनी वाढले आहेत.
इराण, इराक आणि अमेरिकेतून ड्रायफ्रूटची आयात
काजूचे भारतातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मात्र, तंजानिया, श्रीलंका, साऊथ आफ्रिका या देशातूनही काजूची आयात केली जाते. बदाम इराण, इराक, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातून आयात केला जातो. तर पिस्ता अमेरिका आणि इराण या देशातून आयात केला जातो. भारतातील ड्रायफ्रूट मागणीचा मोठा भाग आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक अस्थिरतेचा थेट परिणाम ड्रायफ्रूटच्या किंमतीवर होताना दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बदाम कर्नेलच्या किंमतीत सुमारे २७ टक्के आणि काजू (डब्ल्यू३२०) मध्ये ३७ टक्के वाढ झाली आहे. कॅलिफोर्नियन पिस्त्यांच्या किमतीतही सुमारे सात टक्के वाढ झाली आहे. व्यापारी आणि उद्योग संघटनांनी या वाढीचे मुख्य कारण जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, वाहतूक खर्च वाढणे आणि सणासुदीच्या काळातील मागणी वाढणे हे असल्याचे सांगितले आहे.
वाढीची प्रमुख कारणे
- पुरवठा कमी होणे ः पुण्यात आधी महिन्याला ३० ते ३५ टन बदाम येत होते, आता ते २० टनवर घसरले आहेत. पिस्त्याची आवकही निम्म्यावर आली आहे.
- ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या प्रमुख उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी झाल्याने आणि पश्चिम आशियातील तणावामुळे इराण-अफगाणिस्तानकडून येणाऱ्या मालावर परिणाम झाला आहे.
- वाहतूक आणि लॉजिस्टिक्स खर्च : आंतरराष्ट्रीय वाहतूक खर्च जवळपास चार पटीने वाढला असून, तो प्रति किलो ७०-८० रुपये अतिरिक्त भार टाकत आहे. काही मार्गांवर व्यत्यय आल्याने मालाला पर्यायी आणि महागड्या मार्गाने येणे भाग पडत आहे.
- फ्रेईट आणि विमा खर्च १५-३० टक्के वाढला आहे
- जागतिक घटक ः इराण आणि अफगाणिस्तानमधील पुरवठा व्यत्यय, कॅलिफोर्नियातील बदाम उत्पादनातील घसरण, काजू पिकातील १५% कमतरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरी यांचाही परिणाम होत आहे.
वस्तू ः पूर्वी - आता
बदाम ः ७५०-९०० - ८५०-१,२००
पिस्ता ः २,४००-२,७०० - २,७००-३,०००
काजू ः ८००-१,२०० - ९००-१,३००
मनुके ः ३००-४०० - ३००-४००
अक्रोड ः ६००-८०० - ६००-८००
चारोळी ः १८०० - १८००
----------
जागतिक पातळीवरील विविध घटकांचा थेट परिणाम भारतात आयात होणाऱ्या ड्रायफ्रूटच्या किंमतींवर होत आहे. कमी उत्पादन, वाहतूक खर्चात वाढ आणि पुरवठा कमी होत असल्याने किमतीत वाढ झाली आहे.
- नवीन गोयल, सुकामेव्याचे व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.