पिंपरी, ता. १७ ः गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा वाढता तडाखा आणि गॅस सिलेंडरचा तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर वाढला आहे. पर्यायाने विजेची मागणी आणि वापर वाढला आहे. आखाती देशांत अजून काही दिवस युद्ध परिस्थिती कायम राहिल्यास विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महावितरणच्या पुणे परिमंडळ क्षेत्रात पुणे, पिंपरी चिंचवड, हवेली, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ आणि वेल्हे या तालुक्यांच्या समावेश आहे. परिमंडळ क्षेत्रात घरगुती, व्यावसायिक, शेती, औद्योगिक, सार्वजनिक असे एकूण सुमारे ३९ लाख ग्राहक असून विजेची कमाल मागणी चार हजार ५०० मेगावॅट इतकी आहे. आखाती युद्धाच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या असून गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. अनेक कंपन्यांना गॅसचा वापर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे अनेकांनी अन्न शिजवण्यासाठी आणि इतर वापरासाठी विद्युत उपकरणांचा वापर सुरू केला आहे. काही कंपन्यांनी गॅसऐवजी विजेवर चालणाऱ्या मशिनरी वापरास सुरुवात केली आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरातही मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर वाढला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. एसी, कुलर यासारख्या एअर कंडिशनर उपकरणांचा वापर वाढल्याने घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून विजेचा वापर वाढला आहे.
राज्यातही मागणी
राज्यात २०२४-२०२५ मध्ये दररोज विजेची सरासरी कमाल मागणी २३,३७४ मेगावॅट होती, तर त्यावेळी विजेचा पुरवठा २४,३३५ मेगावॅट होता. यंदा विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. १४ मार्च रोजी सुमारे २६,८१४ मेगावॅट, १६ मार्च रोजी सुमारे २८,००० आणि १७ मार्च रोजी सुमारे २८,०४८ मेगावॅट इतका पुरवठा होता. यावरुन गेल्यावर्षीच्या तुलनेत दिवसाला सुमारे अडीच ते चार हजार मेगावॅट विजेची मागणी वाढल्याचे दिसून येते.
पुणे परिमंडळातील वीज ग्राहक
घरगुती - ३३, ८७,८८९
व्यावसायिक - ३, ९५,५१९
शहरातील वीज ग्राहक
घरगुती - ८, ३७,९९४
व्यावसायिक - ८८, ७९४
पथदिवे - १, ९२५
औद्योगिक - १९,३४८
इतर - ७,७०४
एकूण - ९,५५,७६५
विजेची मागणी दररोज कमी जास्त होते. दिवसात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वीजेच्या मागणीत बदल होतो. ऋतूनुसारही मागणीत बदल होत असतो. भविष्यात वीजेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे परिमंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.