बदाम, खजुरासह पिस्त्याची युद्धामुळे भाववाढ
रमजाननिमित्त सुकामेव्याला मागणी; पुरवठा साखळी विस्कळित
पिंपरी, ता.१८ : रमजानच्या पार्श्वभूमीवर दुकानांत खजूर, बदाम, ड्रायफ्रूट्सला मागणी वाढली आहे. दुसरीकडे आखाती देशांतील युद्धाचा परिणाम सुकामेवा आणि खजुराच्या किमतीवर झाला आहे, तर पिस्ता, बदाम, जर्दाळू, मनुका आणि खजुराचे भाव सुमारे १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
रमजान महिन्यात उपवास सोडताना (इफ्तार) पौष्टिकतेसाठी आहारात सुकामेव्याचा वापर केला जातो. त्यामुळे खजूर, काजू, बदाम, बेदाणा, चारोळी, पिस्ता, अंजीर, अक्रोड, केशर, खोबरे आदी सुकामेव्याला मोठी मागणी असते. या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन विक्रेते १५ ते २० दिवस आधीच सुकामेव्याची मागणी करतात. रमजानमध्ये विविध प्रकारची मिठाई तयार करण्यासाठी, दैनंदिन आहार आणि भेटवस्तू देतानाही सुकामेव्याचा वापर केला जातो. त्यामुळे मागणी ३० ते ३५ टक्के वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान, बहुतांश सुकामेवा अमेरिका आणि आखाती देशांमधून भारतात आयात होतो. यंदा रमजानमध्येच अमेरिका-इराणयुद्धाचा भडका उडाल्याने आयातीवर परिणाम होत आहे. त्यामुळे इराणी पिस्ता १,६५० वरून २,४०० प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. काळ्या मनुकांचे भाव २५० वरून ४५० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत.
खजुरांचे प्रकार आणि भाव (प्रतिकिलो/रुपयांत)
मबरूम खजूर : ९०० (मदिना वाण)
सफावी खजूर : १६०
जाहिदी खजूर : १७०
लायन डेलीकसी खजूर : २८० (५०० ग्रॅम).
सामान्य खजूर : १५० ते ३००
अन्य सुकामेव्याचे भाव (प्रतिकिलो/रुपयांत)
काजू : ७५० ते १,२०० (आकारानुसार)
बदाम : ५६० ते ६५०
पिस्ता : ९०० ते १,३००
अक्रोड : ८०० ते १,४००
युद्धामुळे जहाजाचे भाडे ४०-५० टक्क्यांनी वाढले
आयात खर्च वाढल्याने खजूर १०-१५ टक्के महाग
रमजान काळात सुकामेव्याला मोठी मागणी असते. आखाती देशांतून पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. तसेच मालवाहतूक खर्च वाढला आहे. या खर्चामुळे सर्वच सुकामेवा महागला आहे.
- सलिम सय्यद, सुकामेवा विक्रेते, पिंपरी कॅम्प