दापोडीत तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी ः पाण्याचा जार आणण्यासाठी जात असताना एका तरुणावर डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. १६) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दापोडीतील गुलाबनगर परिसरात घडली. रोहित उर्फ झुणझुण्या अशोक गुजरे (वय १९, रा. महादेव मंदिराशेजारी, दापोडी गावठाण, दापोडी) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तुषार तुकाराम चाराकटले (वय २४, रा. सिद्धार्थ नगर, लकी होम टीव्ही शोरूम मागे, दापोडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (ता. १७) याबाबत दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
दुचाकीची मोटारीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी ः भरधाव वेगातील दुचाकीने मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तसेच सहप्रवासीही गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) रोजी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माण येथील नेक्सास हॉस्पिटलजवळ घडली. मिलन शेख (वय २२, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, जि. पुणे, मूळ रा. मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. विकी दादा औघडे (वय २२, रा. माण, ता. मुळशी, जि. पुणे, मूळ रा. जुनोनी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी मंगळवारी (दि. १७) याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीवरील सहप्रवासी समीर उल पिता समीर मिर्झा गंभीर जखमी झाला आहे.
भाड्याचा वाद, प्रवाशाच्या बोटाचा चावा
पिंपरी ः रॅपिडो बुकिंगच्या भाड्यावरून झालेल्या वादातून चालकाने प्रवाशाला मारहाण करत त्याच्या बोटाचा चावा घेतल्याची घटना सोमवारी (ता. १६ मार्च) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास हिंजवडीतील ब्लू रिज सोसायटी परिसरात घडली. संदीप दगडू काळे (वय ३०, रा. साई प्रसाद सोसायटी, अंबाई माता रोड, धायरी, पुणे) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनुराग किशोर विश्वनाथ भगत (वय ४२, रा. नाना पेठ, पुणे) असे जखमी प्रवाशाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (ता. १७) याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी ऑनलाइन ॲपद्वारे वाहन बुक केले असता भाड्यावरून आरोपीसोबत वाद झाला. संतापलेल्या आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या हाताच्या करंगळीला चावा घेत गंभीर जखमी केले.
द्रुतगती मार्गावर अफू जप्त; तरुण अटकेत
पिंपरी ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वडगाव महामार्ग कार्यालयासमोरील परिसरात अफूची तस्करी करणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून सात लाख ८४ हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (ता. १७ मार्च) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. रोशनलाल नारायणलाल जाट (वय २५, रा. चित्तोडगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलिस हवालदार नितीन लोखंडे यांनी मंगळवारी (ता. १७) याबाबत शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीकडून सुमारे ९८० ग्रॅम वजनाचा अफू जप्त करण्यात आला.
मोटारीची पिकअपला धडक; मद्यपी चालक अटक
पिंपरी ः भरधाव वेगातील मोटारीने पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात मुंबई - बंगलोर महामार्गावर बावधन येथे सोमवारी (ता. १६ मार्च) रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडला. स्वप्नील उर्फ रोशन बाळासाहेब पिंगळे (वय २६, रा. कोथरूड, पुणे, मूळ रा. धाराशिव) असे अटक आरोपीचे नाव आहे. नीलेश अरविंद गायकवाड (वय ३९, रा. सातारा) असे पिकअप चालकाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (ता. १७) याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने मद्यप्राशन करून मोटार भरधाव वेगात चालवत वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले. त्याने पिकअपला पाठीमागून धडक दिली. अपघातात पिकअप पलटी होऊन त्यातील कलिंगडांचेही मोठे नुकसान झाले. तसेच दोघेजण जखमी झाले.
कुंडी खरेदीवरून वाद; तिघांचा व्यापाऱ्यावर हल्ला
पिंपरी ः कुंडी खरेदीच्या कारणावरून झालेल्या वादातून व्यापाऱ्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) रोजी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चऱ्होली परिसरात घडली. ऋषिकेश विठ्ठल तापकीर (वय २५, रा. वडमुखवाडी, पुणे) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी अशी आरोपींची नावे आहेत. राजेश चिमाजी वामन (वय ४५, रा. चऱ्होली बु., पुणे) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. १७) याबाबत दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी कुंडी खरेदी करण्यासाठी दुकानात आले होते. कुंडी कमी दरात देण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत कुंडीने डोक्यात मारहाण केली व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
चिंचवडमध्ये कोयता जप्त, तरुणास अटक
पिंपरी ः बंदी आदेश असतानाही कोयता जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) रोजी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे करण्यात आली. संग्राम समीर येळवंडे (वय २२, रा. दत्तनगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार लहू पाटील यांनी मंगळवारी (ता. १७) याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाई आदेश लागू असताना आरोपीकडे १०० रुपये किमतीचा विनापरवाना लोखंडी कोयता आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दारू बाळगणाऱ्या एकावर गुन्हा
पिंपरी ः बेकायदेशीररीत्या दारूचा साठा ठेवून विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास चाकण - शिक्रापूर महामार्गावर भोसे गावच्या हद्दीत करण्यात आली. भगवान रामभाऊ शेवाळे (वय ४५, रा. भोसे, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार केशव घोटकर (वय ३६) यांनी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १७) याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपीकडून सुमारे १४ हजार ४३५ रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. हा साठा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आला होता.