पिंपरी, ता.१९ ः पिंपरी चिंचवड शहरात गुढीपाडव्यानिमित्त यंदाही नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला. कासारवाडी, वाकड, यमुनानगर, प्राधिकरण आणि चिंचवड येथे परंपरेचा वारसा सांगणाऱ्या मिरवणुका काढून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईच्या उत्साहात हिंदू नववर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले.
कासारवाडीत मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे ‘शिवराज्याभिषेक’ संकल्पनेवर आधारित भव्य मिरवणुकीत शिवशाहीचा काळ अवतरला. नऊवारी साड्या आणि नाकात नथ अशा पारंपरिक पेहरावात महिलांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. ग्रंथ पालखी, ढोल-ताशांचा निनाद, भगवे फेटे हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
विविध समाजांचा सहभाग
सकल हिंदू समाज, यमुनानगर (निगडी) आयोजित मिरवणुकीला दुपारी साडेचार वाजता अष्टविनायक मंदिर येथून सुरूवात झाली. अष्टविनायक मंदिर, किर्लोस्कर कॉलनी, यमुनानगर, निगडी मार्गे मधुकर पवळे क्रीडांगण येथे मिरवणुकीची सांगता झाली. ग्रंथ पालखी, केरळी वाद्यवृंद, संघ शताब्दी रथ, लेझीम पथक, मारवाडी समाज, माहेश्वरी समाज, शालेय मुलांचा सहभाग ही मिरवणुकीची प्रमुख आकर्षणे ठरली.
वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन
भारतीय संस्कृती मंच प्राधिकरण, निगडीच्यावतीने स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साडेसहा वाजता झाली. संत ज्ञानेश्वर चौक, धन्वंतरी हॉस्पिटल चौक, बिग इंडिया ते स्वामी समर्थ मंदिर मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक स्थानिक संस्थांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडविले. निगडी - प्राधिकरण परिसरात आध्यात्मिक, ग्रंथांच्या पालखीसह श्लोकांच्या उत्तुंग उद्घोषात, टाळ मृदंग व लेझीम पथकांच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली.
चिंचवडमध्येही उत्साह
संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, चिंचवड विभाग, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी व समविचारी संस्थांच्यावतीने हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त पारंपरिक वेशात हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्री धनेश्वर मंदिर येथे महाआरती व प्रसाद होऊन मिरवणुकीची सांगता झाली.
वाकडमध्ये हिंदू संमेलन
वाकडमध्ये सकल हिंदू समाज आणि नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पारंपरिक वातावरणात भव्य हिंदू संमेलन व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषा, पुरुष-महिलांचे पारंपरिक नृत्य आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके ही या मिरवणुकीची मुख्य वैशिष्ट्ये ठरली. या मिरवणुकीत पारंपरिक साडी (नऊवारी), फेटे घालून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच ढोल-ताशांच्या गजरात नवीन वर्षाचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.