पिंपरी, ता. ४ : ‘‘जल, वायू, ध्वनी प्रदूषण रोखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी कचरा कमी करणे, प्लॅस्टिक टाळणे, पाणवठे स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे, वृक्षलागवड, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्रदूषणकारी उद्योगांवर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे,’’ अशी भावना पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरांतील जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाबाबत ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ अशी वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे. प्रदूषणावार मात करण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासानाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनाही जाणून घेतल्या आहेत. मात्र, त्या तुटपुंजा असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनीही प्रशासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाच्या उणिवांवर बोट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर परखडपणे व्यक्त होत नागरिकांनी आपल्या भावना ‘सकाळ’च्या व्यासपीठावर मांडल्या आहेत.
पिंपरी चिंचवडमधील हवा आणि जल प्रदूषण केवळ मानवांनाच नाही, तर असंख्य निष्पाप प्राण्यांनाही हानी पोहोचवत आहे. वाहने आणि कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर हवा प्रदूषित करतो, ज्यामुळे पक्षी आणि भटक्या प्राण्यांना श्वास घेणे कठीण होते. प्राणी अनेकदा दूषित पाणी पितात किंवा उघड्या भागात टाकलेले प्लॅस्टिक आणि रसायने खातात, ज्यामुळे वेदनादायक दुखापती किंवा मृत्यू होतो. ते शांतपणे सहन करतात. कारण ते प्रतिकार करू शकत नाहीत. प्रत्येक सजीवासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. कचरा कमी करणे, प्लॅस्टिक टाळणे, पाणवठे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
- पल्लवी फंदाट, भोसरी
जल, वायू, ध्वनी प्रदूषण रोखणे हे सर्वस्वी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून त्या प्रमाणे कोणीही या विषयावर गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे प्रत्येक ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. मोटार, स्कूटरवरून जाणारे नागरिक जाता जाता प्लास्टिक पिशव्या भिरकावताना जागोजागी दिसतात. आठवड्यातून दोन दिवस मोटार, स्कूटर, अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी. तसेच प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा. त्याच प्रमाणे बांधकामे एक ते दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवावेत. तरच निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो.
- संजय दुर्वे, प्राधिकरण, निगडी.
वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधून उडणारी धूळ तसेच झाडतोड ही या प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. वाहनांच्या धुरामुळे हवेत सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड या औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांत हवा शुद्ध ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरणे, वृक्षलागवड, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्रदूषणकारी उद्योगांवर नियंत्रण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. स्वच्छ हवा ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याने सर्वांनी मिळून प्रदूषण कमी करण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- एक नागरिक
पिंपरी चिंचवड शहरात सध्या वायू प्रदूषण आणि नदी प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. औद्योगिक धूर, बांधकामातील धूळ, तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता खालावत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून श्वसनविकार व इतर आजार वाढताना दिसत आहेत. तसेच, पवना नदी व इंद्रायणी नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी, कचरा व औद्योगिक रसायने सोडली जात असल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पर्यावरणास तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
- प्रशांत शिगवण, चिंचवड
सध्या विविध कारणांनी पिंपरी चिंचवड, पुणे येथील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत आहे. वायू प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असणारी बांधकामे, त्यातून उधळणारे धुळीचे लोट, धुरळा यामुळे सतत होणारी सर्दी व खोकला याचे प्रमाण वाढतच आहे. कोणत्याही औषधाने बरा न होणारा खोकला खूप त्रासदायक ठरत आहे. त्यात वाढत्या वाहनांमुळे हवा प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे बांधकाम करताना महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता गरजेची आहे. बांधकामामुळे ध्वनी प्रदूषणही होते. त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- पुष्पा पाटोळे, थेरगाव
पिंपरी चिंचवडमध्ये अनियंत्रित हवा प्रदूषण होत आहे. रावेत, पुनावळे भागांत धुळीमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांची धूळ आणि वाढती वाहनसंख्या यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अस्तित्व दिसत नाही. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा रुग्ण सर्वाधिक धोक्यात आहेत. प्रशासनाकडून त्वरित व कायमची उपाययोजना व्हावी.
- प्रमोद दुर्गुळे, रावेत.
शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच करत नाही. त्यामुळे हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार झाला. लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- अनिल लोखंडे, निगडी
शहरातील प्रदूषणासारख्या महत्त्वाच्या विषयावर ‘सकाळ’ने आवाज उठवला त्याबद्दल ‘सकाळ’ वृत्तसमूहाचे आभार. सांडपाणी थेट नदीमध्ये जाऊ नये, म्हणून महापालिकेने एसटीपी प्लॅंट केले, त्याची क्षमता शहरीकरण पाहता केली होती का? आणि त्यातील किती सुरू आहेत? किती पाण्यावर प्रक्रिया होते? याचा अहवाल आहे का? यावर आपण आवाज उठविल्यास राजकारणी बोलतात. मात्र, प्रत्यक्षात यांचीच माणसे व महापालिका अधिकारी यास कारणीभूत आहेत.
- नीलकंठ झपके, बोपखेल
नदी-नाल्यांचे प्रदूषण थांबायला हवे. प्रशासनासह नगरसेवकांनी आपले भागावर लक्ष ठेवले तर हे शक्य होईल. वाढत्या प्रदूषणामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
- तुकाराम पाटील, पिंपरी
मी ‘सकाळ’ वृत्तपत्राचा वाचक आहे. आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या तुम्ही मांडल्याबद्दल खरोखर आभारी आहे. प्रदूषणाच्या समस्येला सर्वोच्च प्राधान्य दिल्याबद्दल तुमचे कौतुक आहे. प्रदूषणाचा सर्वांनाच त्रास होत आहे, पण त्याबद्दल कोणीही बोलत नाही. तुम्ही त्यामागील सर्व वस्तुस्थिती मांडली आहे. महत्त्वाच्या सामाजिक समस्यांना योग्य दिशेने नेत आहात. दर्जेदार जीवनमानासाठी शुद्ध हवा, पाणी आवश्यक आहे.
- अविनाश पवळे, रावेत
‘सकाळ’ने इंद्रायणी नदी प्रदूषण, वाहतूक व्यवस्था तसेच हवा प्रदूषण हा विषय ताकदीने लावून धरला या बद्दल अभिनंदन. ही खूप मोठी समस्या असून, शहरात राहणंच अवघड झाले आहे.
- रामचंद्र दिवेकर, चोवीसावाडी, चऱ्होली
नदी प्रदूषण टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी. कचरा फेकला की दंड करावा, प्लॅस्टिक निर्मिती व वापर यावर बंदी हवी. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे सतत बिंबवले पाहिजे. ओला कचरा सर्वांनी घरच्या घरी जिरवावा.
- डॉ. स्वाती दगडे, चऱ्होली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.