पिंपरी, ता. ५ : एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून वर्गांमध्ये अध्यापन केले. यातून त्यांना शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव झाली. प्राचार्या अमृता करनेल, स्वाती देशपांडे आणि ज्योती बक्षी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना श्रीफळ, तर शिक्षकांना बुकमार्क देऊन कृतज्ञता व्यक्त केली. नववीच्या विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर केली. दुसरीतील अधिरा गुंजवटे हिने शिक्षकांविषयी विचार मांडले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. दहावीतील जागृती साहू हिने शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. पसायदानाने सांगता झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ज्ञानदानाबद्दल आदर व्यक्त केला आणि अध्यापनाचा अनुभव घेतला.
गोसलिया स्कूलमध्ये दहीहंडीचा उत्साह
पिंपरी ः श्री जैन विद्याप्रसारक मंडळाच्या सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत दहीहंडी फोडण्यात आली. संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया आणि प्राचार्या सीमा लिंभोरे यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी रंगविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
पिंपरी ः कागदी लगदा आणि नैसर्गिक मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींना नैसर्गिक रंगांनी सजवत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सणांचा संदेश दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाकड येथील माध्यमिक विद्यालयात ‘पर्यावरणपूरक गणपतीबाप्पा रंगवा’ कार्यशाळा उत्साहात झाली.
महापालिका आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या पुण्यातील हातकागद संस्थेच्या वतीने बुधवारी कार्यशाळा घेण्यात आली. मुख्याध्यापिका अनिता दुडे आणि पर्यवेक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक सागर बंडलकर यांनी नियोजन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्व समजावून सांगितले. ‘आपली संस्कृती व वारसा जतन करूयात; पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करूयात’, असा संदेश यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांना कागदी लगदा व नैसर्गिक मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती देण्यात आल्या. नैसर्गिक रंगांचा वापर करून त्यांनी मूर्तींना सुबक रंगकाम केले. हातकागद संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक श्रावणी चव्हाण, ऋषिकेश चिखले आणि संस्थेच्या २१ सदस्यांच्या पथकाचे सहकार्य लाभले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.