पिंपरी, ता. १६ : पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याच्या (अंतर्गत रिंगरोड) भूसंपादनाला वेग आला आहे. काही गावांमधून अद्याप विरोध होत कायम आहे. त्यावर ग्रामबैठका आणि संवादातून अडथळे दूर करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या २१ पैकी पूर्वीच्या तीन आणि आता पाच अशा आठ गावांतील जमीन मोजणी पूर्ण झाली असून, अन्य गावांमध्ये विविध कारणांमुळे प्रक्रिया रखडली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ६५ मीटरचा हा रिंगरोड विकसित करण्यात येत आहे. चार तालुक्यांतून जाणाऱ्या या मार्गासाठी वेगवेगळ्या गावांतील जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. खासगी जमिनी थेट खरेदीने संपादित करण्याचा प्रस्ताव असल्याने प्रक्रियेला गती मिळाली आहे. मात्र, काही गावांमधील विरोध, रस्त्याच्या आखणीत संभाव्य बदल आणि मोजणीसाठी सहमती न मिळणे, यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. भूसंपादन लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पथकाची नियुक्ती केली आहे. हे अधिकारी गावोगावी संवाद साधत आहेत. मोजणी पूर्ण झालेल्या गावांमध्ये भूसंपादन अधिसूचना काढणे आणि मोबदला दरनिश्चिती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील निरगुडी, वडगाव शिंदे आणि वडाचीवाडी या गावांतील बाधित जमीनधारकांना मोबदल्याची रक्कम मिळाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. अन्य गावांमध्ये तांत्रिक त्रुटी, प्रस्तावातील बदल आणि मोजणीसंदर्भातील चर्चेमुळे प्रक्रिया सुरू आहे. मुळशी तालुक्यात जमीन मोजणी सुरू आहे. तर, भुगाव येथे इमारतींचे बांधकाम बाधित होत असल्याने रस्त्याच्या आखणीत बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. मावळ तालुक्यात गावांतील जमीन मोजणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे.
- तालुकानिहाय बाधित गावे
हवेली : निरगुडी, वडगाव शिंदे, कोलवडी, कदमवाकवस्ती, वडाचीवाडी, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द
मावळ : गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, धामणे, परंदवडी, दारुंब्रे
खेड : सोळू इंटरचेंज, सोळू
मुळशी : भूगाव, नांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे
भूसंपादनाची सद्यःस्थिती
- मोबदला मिळालेली गावे : निरगुडी, वडगाव शिंदे, वडाचीवाडी
- मोजणी पूर्ण : हिंजवडीसह चार गावे
- मोजणी सुरू : कोलवडी, मांजरी खुर्द, जांबे, मारुंजी, नांदे, परंदवडी, वडकी
- विरोध दर्शविलेली गावे : कदमवाकवस्ती, माण, नेरे, सोळू इंटरचेंज, मावळातील काही गावे
- आखणीत बदलाची शक्यता : भूगाव, कदमवाकवस्ती
- मोबदल्यासाठी निधी : निरगुडी, वडगाव शिंदे आणि सोळू या तीन गावांसाठी १४४ कोटी रुपये वर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.