पिंपरी, ता. २ : दुबईतून सायबर फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने अटक केली. सुमंत ऊर्फ नानू रवींद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे आरोपीचे नाव आहे. दुबईतून प्रत्यार्पण झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. चिनी सायबर गुन्हेगारांच्या साथीत त्याने मोठे गुन्हे केल्याचे उघड झाले. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावल्याची प्राथमिक माहिती आहे.
याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली होती. तुषार आमराराम चौधरी (रा. मोरे वस्ती, चिखली) व आदर्श संतोष वाघमारे (रा. आकुर्डी) अशी त्यांची नावे आहेत.
सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान तुषार आणि आदर्श यांना पोलिसांनी अटक केली होती. ते वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून त्याची माहिती सुमंतला देत. सुमंत या खात्यांवर सायबर फसवणुकीचे पैसे पाठवायचा. त्यानंतर तुषार व आदर्श स्वतःचे कमिशन ठेवून उरलेली रक्कम सुमंतला दुबईत पाठवत.
सुमंतच्या अटकेसाठी ''लूक आऊट सर्क्युलर नोटीस'' (एलओसी) जारी करण्यात आली होती. मुंबई विमानतळावर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याच्यावर यापूर्वी हैदराबाद आणि काळेवाडी पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
----------------
चिनी गुन्हेगारांसह भागीदारी
सुमंत सुरुवातीला काही रकमेच्या पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत होता. यात त्याला फसवणुकीच्या रकमेवर चार टक्के कमिशन मिळत होते. यानंतर तो चिनी आरोपींकडून इंटरनॅशनल कार्ड्स घेऊन मॉल्समध्ये स्वाइप करून महागड्या वस्तू खरेदी करू लागला. त्याला सायबर गुन्ह्यांची संपूर्ण प्रक्रिया समजल्यानंतर त्याने चिनी आरोपींसह भागीदारी सुरू केली. यात त्याला वीस टक्के रक्कम मिळत असे. या कामासाठी त्याने तुषार आणि आदर्श यांच्याकडून दीडशेहून अधिक बँक खाती मिळवून त्यावर फसवणुकीतील रक्कम प्राप्त केली.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.