काय चाललंय राजकीय पक्षांत ः लोगो
---
अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ ः महापालिकेतील सहा नगरसेवक आणि लोकसभेत एक खासदार ही पिंपरी चिंचवड शिवसेनेची जमापुंजी. शहराच्या राजकारणात मात्र पाहिजे तसा दबदबा निर्माण करता आलेला नाही, ही वस्तुस्थिती. पक्षफुटीनंतर कार्यकर्ते, मतदार आणि नेतेही विखुरले, त्यांची मोट बांधण्याची गरज. त्यासाठी शिवसेनेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दुसऱ्या फळीतील नेतृत्वाची कमतरता जाणवत आहे.
शहरातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत नसल्याने दोन्ही शिवसेना शहरात अस्तित्वात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेकडे सलग तीन वेळा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांचे नेतृत्व आहे. तरीही शहर पातळीवर स्वतंत्र राजकीय भूमिका आणि आक्रमकता दिसून येत नाही. महापालिका निवडणुकीत स्वतःचा मुलगा निवडून यावा यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीसोबत केलेली छुपी राजकीय जुळवाजुळव असो किंवा सध्या सभागृहात ठोस आवाज न उठवता कामे करून घेण्याची भूमिका असो, यामुळे शिवसेनेची स्वतंत्र ओळख धूसर होताना दिसते आहे. महापालिकेत सहा नगरसेवक असूनही शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही शिवसेना आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आक्रमक बाणाही नाही. त्यामुळे शहर नेतृत्वाने पक्षाला भाजपच्या दावणीला बांधले आहे की काय? अशी शंका येते.
पक्षफुटीनंतर अस्तित्वात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन तरुण नेतृत्व मिळाले आहे. मात्र, राजकीय अनुभवाच्या मर्यादा आणि संघटनात्मक पकड पाहता पक्षाला अपेक्षित सूर अद्याप गवसलेला नाही. अनुभवी नेतृत्वाची कमतरता आहे. कमकुवत संघटन, बूथ स्तरावर तोकडी यंत्रणा आणि मजबूत कार्यकर्त्यांचा अभाव, यामुळे पक्ष वाढीचे सर्वात मोठे आव्हान आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.
दोन्ही पक्षांसमोर पक्ष संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. शिवसेनेला खासदारकी आणि नगरसेवकांची ताकद प्रत्यक्ष संघटनात रुपांतरित करावी लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नव्या शहर नेतृत्वाखाली प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वात स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करणे, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे या गोष्टी केल्याशिवाय दोन्ही गटांना शहरात मोठी झेप घेणे कठीण आहे.
शिवसेना
सद्यस्थिती
- नेतृत्वाकडून जवळचे कार्यकर्ते आणि घरातच महत्त्वाची पदे
- भाजप, राष्ट्रवादीशी राजकीय जुळवाजुळवीने स्वतंत्र ओळख धूसर
- महत्त्वाच्या प्रश्नांवर फारसे आक्रमक न होता, कामे करून घेण्यावर भर
- नवीन कार्यकर्त्यांची फळी आणि प्रभागनिहाय मजबूत संघटन उभारण्याकडे दुर्लक्ष
प्रमुख आव्हाने
- शिवसेना भाजप-राष्ट्रवादीवर अवलंबून न राहणे
- नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करणे
- प्रभागनिहाय संघटन मजबूत करणे
- शहरातील तीनही विधानसभेत सक्षम नेतृत्व उभे करणे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
सद्यस्थिती
- नवीन शहरप्रमुखाची संघटनेवर अपेक्षित पकड नाही
- माजी आमदार वगळता अनुभवी नेतृत्वाची कमतरता
- निवडणुकांतील पराभवानंतर पक्षनेतृत्वाचे दुर्लक्ष
- शहर विकासाचा अजेंडा ठळकपणे पुढे आणण्याची गरज
आव्हाने
- नवीन शहरप्रमुखांना संघटनेवर पकड बसवणे
- अनुभवी नेतृत्व देणे, प्रभागनिहाय बूथ रचना उभारणे
- संघटन मजबूत करून कार्यकर्त्यांची सक्षम फळी निर्माण करणे
- कार्यकर्ते आणि नेत्यांचे आऊटगोईंग रोखणे
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.