पिंपरी, ता. २६ : पवना तसेच आंद्रा धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यातच मॉन्सून उशिरा दाखल झाला आहे. त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनबद्ध आणि संतुलित व्हावा, यासाठी महापालिकेने रविवारपासून (ता. २८) पाणीपुरवठ्याच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरातील विविध भागांना किमान एक तास, तर कमाल तीन तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
याबाबतची माहिती सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली. सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाऊस लांबल्यामुळे धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण वाढला आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत कमी दाबाने किंवा कमी वेळ पाणी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वितरणाचा आढावा घेऊन क्षेत्रनिहाय वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले असून ते नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
- क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र वेळापत्रक
- २८ जूनपासून नवे वेळापत्रक लागू
- सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र वेळा निश्चित
- किमान एक तास, कमाल तीन तास पाणीपुरवठा
- नागरिकांनी आपल्या भागातील वेळ तपासून पाणी साठवावे
पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार असून, काही भागांमध्ये केवळ वेळेत बदल होणार आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांवर ताण वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे आणि पाणी बचतीच्या उपक्रमांना सहकार्य करावे. मोठी वाणिज्यिक संकुले, गृहनिर्माण संस्था व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.