पिंपरी, ता. १९ ः गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असले, तरी यंदा प्रसाद महागला आहे. सणासुदीच्या काळात लागणाऱ्या खवा, साखर, सुकामेवा आणि दुधाच्या किमती वाढल्याने मिठाईच्या भावात मोठी वाढ झाली आहे.
यंदा मोदक, पेढे, लाडू आणि इतर पारंपरिक मिठायांच्या किमती १० ते २५ टक्के वाढल्या आहेत. साखर आणि दुधाचे दर वाढल्यामुळे मिठाईविक्रेत्यांना भाववाढ करणे भाग पडले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रति किलोमागे किमान ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने नाईलाजास्तव दर वाढवावे लागल्याचे मिठाईविक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे सणासुदीच्या आनंदावर महागाईमुळे विरजण पडल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
‘किलो’ ऐवजी ‘पावशेर’
वाढत्या महागाईमुळे भाविकांनी खरेदीच्या प्रमाणात कपात करणे भाग पडले आहे. पूर्वी जे भाविक प्रसादासाठी ५ ते १० किलो मिठाई किंवा मोदक खरेदी करत होते, ते आता २ ते ३ किलो किंवा अर्धा किलो किंवा पावशेरावर आले आहेत. घरगुती गणपतीसाठीही मिठाईऐवजी घरीच बनवल्या जाणाऱ्या पदार्थांकडे किंवा कमी प्रमाणातील खरेदीकडे कल वाढला आहे.
भावांवरील परिणाम
- काजू मोदक : १,००० ते १,२०० रुपये प्रति किलोवरून थेट १,२०० ते १,४०० रुपये
- मावा पेढे : प्रति किलो ५० ते ८० रुपयांनी वाढ
- बुंदीचे लाडू : किलोमागे ३० ते ५० रुपयांनी महाग
---
महागाईमुळे बजेट कोलमडल्याने ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. अनेक कुटुंबांनी आता बाजारातील मिठाईऐवजी घरातच पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक बनवण्यावर भर दिला आहे. आम्हीसुद्धा तेच करतोय.
- अनिता महाजन, गृहिणी, वाल्हेकरवाडी
कच्च्या मालाचे दर, गॅस सिलिंडर, वाहतूक खर्च आणि कारागिरांची मजुरी वाढली आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव मिठाईचे भाव वाढवणे भाग पडले आहे. नफ्याचे प्रमाण कमी ठेवूनही ग्राहकांना वाढीव भावाचा फटका बसत आहे, ज्यामुळे यंदा विक्रीवर नेहमीपेक्षा थोडा परिणाम झाला आहे.
- अमित शहा, मिठाईविक्रेते
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.