पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत १३० उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमांसाठी १३९ उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले. विशेष म्हणजे निवड झालेल्यांमध्ये महापालिकेच्या शाळांत शिक्षण घेतलेल्या दोन माजी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ च्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिफारस झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या फेरीतील उमेदवारांच्या पडताळणीनंतर पात्र व अपात्र उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त ममता शिंदे आणि प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या आधिपत्याखाली ही प्रक्रिया पार पडली.
एक अपात्र तर आठ जणांचे अभिप्राय मागविणार
चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये सोमवारी (ता. २) समुपदेशन झाले. शासनाच्या निकषांनुसार प्रथम दिव्यांग, त्यानंतर महिला आणि उर्वरित उमेदवारांना गुणवत्ताक्रमानुसार संधी देण्यात आली. उपलब्ध रिक्त पदांनुसार माध्यम आणि पदनिहाय समुपदेशन करून पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. एक उमेदवार शैक्षणिक अर्हतेअभावी अपात्र ठरला. आठ उमेदवारांच्या पात्रतेबाबत अभिप्राय मागविण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडे पत्र पाठविण्यात आले असल्याचे प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले.
नव्या नियुक्त्यांमुळे महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांची उपलब्धता वाढणार असून, शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला गती मिळाली आहे. तसेच पात्र उमेदवारांना नियुक्तीची संधी मिळाली आहे. महापालिकेच्या शाळेत शिकून त्याच शिक्षण व्यवस्थेत शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी दोन माजी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्यांची निवड महापालिकेच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
- ममता शिंदे, उपायुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.