सोमाटणे ग्राम ः लेख १४
-------------------------
निसर्गाच्या सानिध्यात फुललेले ‘रोपविश्व’
निसर्गाच्या सानिध्यात फुललेले एक रोपविश्व आणि गेल्या वीस वर्षांत नर्सरी उद्योजकांची सोमाटणे परिसरात झालेली भरभराट पाहण्याजोगी आहे. आज या ठिकाणी राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात मागणीनुसार रोपांचे वाटप केले जाते. गुजरात येथील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘वनतारा’ या संस्थेतही सोमाटणे येथील नर्सरीतील रोपे जात आहेत.
- प्रवीण चौधरी, संस्थापक, सिद्धिविनायक ग्रीन इंडिया
गा वातील ग्रामसमृद्धीत कोणाचा कसा हातभार लागेल, हे सांगता येत नाही. परंतु सोमाटणे येथील धर्तीवर दहा गुंठ्यांपासून अडीचशे एकर क्षेत्रावर पसरलेले नर्सरीचे जाळे तरुणांना शेतीबरोबरच जोडधंद्यासाठी मोठे माध्यम झाले आहे. यासाठी सोमाटणे गावातील वातावरण, येथील सुपीक माती, बारा महिने वाहणारी पवनानदी आणि गावातील साधीभोळी माणसे यामुळे सोमाटणेचा अनेक बाजूंनी विकास झाला आहे. अनेक नर्सरीचालक या ठिकाणी आले आणि गावाच्या विकासाबरोबरच महसुलातही भर पडली.
कृषी शिक्षणातून नर्सरी उद्योगाकडे
माझे शिक्षण कृषी विज्ञान शाखेतून २००० मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मी लार्सन अँड टुर्बो या कंपनीमध्ये २००२ पासून २००९ पर्यंत हॉर्टीकल्चर म्हणून लोणावळा येथे काम पाहिले. काम करत असताना मला पहिल्यापासूनच निसर्गामध्ये काम करण्याची आवड होती. त्यामुळे स्वतःची रोपवाटिका सुरू करण्याचे स्वप्न मी पाहिले होते.
सिद्धिविनायक ग्रीन इंडियाची सुरुवात
‘‘मी २००९ मध्ये जागा शोधण्यास सुरुवात केली. मला परंदवडी-सोमाटणे येथील जागा आवडली. मावळ तालुक्यातील परंदवडी, सोमाटणे, बेबडओहळ या भागात पाण्याची काही अडचण नव्हती. तसेच रोपवाटिकेला लागणारे पोषक वातावरण येथे उपलब्ध होते. विशेष म्हणजे, येथे सहकार्य करणारा मित्रपरिवार आणि गावातील ग्रामस्थ यांचेही मोठे सहकार्य मिळाले. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून सुरुवातीस २००९ मध्ये सिद्धिविनायक ग्रीन इंडिया या नावाची नर्सरी सुरू केली. यासाठी २० गुंठे क्षेत्रात आम्ही रोपटे लावले होते. ते आज पाहता पाहता २०२६ मध्ये ३० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रात डौलात उभे आहे.
मावळच्या वातावरणाला अनुरूप रोपांची निवड
आम्ही नर्सरीमध्ये फॉरेस्ट, शोभिवंत रोपे, पाम तसेच पाम अशा प्रकारे आपल्या मावळ तालुक्यातील वातावरणात चांगल्या प्रकारे वाढतात, अशा रोपांची निवड करून ती बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीस काही अडचणी आल्या. काही रोपांना जास्त पाऊस किंवा थंडीमध्ये अडचण येत होती. परंतु या अडचणींवर मात करून रोपांच्या कोणत्या जाती योग्य आहेत, याची निवड केली आणि त्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
रिलायन्स परिवारासोबत कामाची संधी
२०२२ मध्ये बीजरानसिंग साहेब, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वनतारा यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना आमच्या नर्सरीमधील रोपांची माहिती दिली. ज्या रोपांची गुणवत्ता त्यांना आवडली, त्यानंतर माझ्या राज्यातून त्यांनी आम्हाला वेंडरशिप दिली. त्यामुळे आम्हाला रिलायन्स परिवारात काम करण्याची संधी मिळाली. गेली चार वर्षे आम्ही त्यांच्याशी काम करत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.
नामांकित संस्थांसोबत काम
आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत काम करत असताना तेथील सर्व लोक सहकार्य करतात. त्यांच्यामुळे नवनवीन गोष्टी आम्हाला शिकण्यास मिळाल्या. आत्तापर्यंत आम्ही एल. अँड. टी. इन्फोसिस, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, वनविभाग महाराष्ट्र राज्य अशा नामांकित संस्थांचे काम करत आहोत. आम्ही आमच्या नर्सरी उद्योजकतेतील गुणवत्ता टिकवली आहे आणि येथून पुढेही ती टिकवण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आहोत. हे सर्व करण्यात अनेक स्थानिक मित्रपरिवार आणि मान्यवरांचे सहकार्य लाभले.
तीस एकरांत विस्तारलेली नर्सरी
सोमाटणे परिसरातील पोषक वातावरण, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे सिद्धिविनायक ग्रीन इंडियाचा विस्तार होत गेला. २००९ मध्ये २० गुंठे क्षेत्रात सुरू झालेली ही नर्सरी २०२६ मध्ये ३० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रात विस्तारली आहे. मी कृषी पदवीधर असून, पत्नी दीप्ती प्रवीण चौधरी बीकॉम आहेत. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या या नर्सरीने सोमाटणे परिसरातील नर्सरी उद्योगाला नवी ओळख मिळवून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.