सोमाटणे ग्राम : लेख १७
----------------------
नर्सरी व्यवसायाची ‘भरारी’
पुणे-मुंबई महामार्गालगतचे सोमाटणे गाव आता पारंपरिक शेतीसोबत नर्सरी व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करीत आहे. भातशेतीला पर्याय म्हणून सुरू झालेल्या रोपवाटिका व्यवसायाने गेल्या दोन दशकांत मोठी भरारी घेतली आहे. सुमारे २५० नर्सरी व्यावसायिक, १०० हेक्टर क्षेत्र आणि देशभरातून मिळणारी मागणी यामुळे सोमाटणेची ‘नर्सरी हब’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
- संतोष थिटे
पुणे-मुंबई महामार्गावर पुणे शहरापासून सुमारे तीस किलोमीटरवर सोमाटणे गाव आहे. लोकसंख्या सुमारे १५ हजारांच्या आसपास असून, भौगोलिक क्षेत्र ८६४ हेक्टरपर्यंत आहे. गावातून पवना नदी जात असल्याने परिसर बागायती आहे. वीस ते २२ वर्षांपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती. ८० ते ९० टक्के शेतकरी भातशेती आणि ऊस घेत होते. बदलत्या वातावरणात रोग-किडींचा प्रादुर्भाव, वाढता खर्च आणि तुलनेने मिळणारे उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. बाजारपेठेतील मागणी व संधी यांचा अभ्यास करता ‘नर्सरी’ (रोपवाटिका) हा पर्यायी व्यवसाय पुढे आला.
सन २००० च्या दरम्यान गावातील सोमनाथ मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, राकेश रजपुत, पथ्थु कावेठिया, सागर कुंभार, बाळासाहेब खापे, चंदू रजपुत, गुलाब महाजन, रूतिक बंन्सल, विजय बुटिया, अनिल वाघेला, दीपक गोरासवा, ललित दळवी, नंदकुमार चांदगुडे, पोपट झावरे, प्रवीण चौधरी, समीर गायकवाड, राजकुमार शहा व टप्प्याटप्प्याने गावातील अन्य शेतकरीही या नर्सरी व्यवसायात उतरले. अडचणी व संकटांवर मात करीत हा व्यवसाय विस्तारला. आजमितीस सुमारे २५० नर्सरी व्यावसायिक या ठिकाणी असून, दहा गुंठ्यांपासून दहा-पंधरा एकरांपर्यंत हा व्यवसाय विस्तारला आहे. सुमारे १०० हेक्टर क्षेत्र त्याखाली असावे.
रोपनिर्मितीसाठी पोषक वातावरण
रोपनिर्मितीसाठी गावातील वातावरण पोषक आहे. त्यामुळे रोपांची वाढ व गुणवत्ता चांगली मिळते. रोपांची सुरुवातीची निगा, छोट्या पिशव्यांमधून मोठ्या पिशव्यांमध्ये स्थलांतर, कलमे बांधणे, प्रतवारी करणे, रोपांच्या वयानुसार किंमत ठरवणे, नेहमीच्या ग्राहकांना नवीन रोपांची माहिती देणे, वाहनांमध्ये रोपे भरून देणे आदी कामे व सेवांमध्ये गावातील शेतकरी कुशल झाले आहेत. ग्राहकांना चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध करून देण्याबरोबर ऊतिसंवर्धित रोपांची निर्मिती करण्यावरही भर दिला आहे. गावातील सोमनाथ मुऱ्हे यांनी प्रयोगशाळा उभी केली आहे. त्याद्वारे शोभेची झाडे (इनडोअर प्लॅंट्स) देखील उपलब्ध केली जातात.
विविध प्रकारच्या रोपांची निर्मिती
सोमाटणे येथे शोभिवंत फुलांमध्ये गुलाब, मोगरा, जास्वंद, जाई, जुई, सदाफुली, चिनी गुलाब, पारिजात, मोरपंखी यांसारखी रोपे तयार केली जातात. औषधी वनस्पतींमध्ये गवती चहा, कोरफड, तुळस, रुई, कांडवेल, गुळवेल यांचा समावेश आहे. फळझाडांमध्ये नारळ, पेरू, डाळिंब, सीताफळ, कलमी आंबा, चिकू, जांभूळ यांची रोपे उपलब्ध आहेत. वनवृक्षांमध्ये वड, पिंपळ, करंज, कांचन, सिल्व्हर ओक, पाम, बॉटल पाम, चिंच, लिंब यांचा समावेश आहे. इनडोअर प्रकारात मनी प्लॅट, नागफणी, जामिया, स्नेकप्लॅंट अशी रोपेही उपलब्ध केली जातात.
देशभरातून रोपांना मागणी
पुणे शहरासह मुंबई, नगर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून रोपांना मागणी आहे. येथील एका नर्सरीतून वनतारा या ठिकाणी देखील रोपांचा पुरवठा केला जातो. परराज्यांतील दिल्ली, हरियाना, चेन्नई, केरळ, पश्चिम बंगाल, भोपाळ, गुजरात आदी ठिकाणीही रोपे जातात. मोबाईल, ई-मेलवरून ‘ऑर्डर्स’ येतात. बांधकाम क्षेत्रातूनही मागणी वाढली आहे. थेट विक्रीवर अधिक भर असल्याने वाहतुकीचा मोठा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. दोन ते ५ वर्षे वयाची रोपे उपलब्ध केली जातात. वनस्पतीनिहाय प्रति रोप १५ ते कमाल ४५०० रुपयांपर्यंत त्यांचे दर असतात.
कोट्यवधींच्या उलाढालीची क्षमता
गावात प्रति नर्सरीधारक महिना किंवा हंगामात एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उलाढाल करतो. या माध्यमातून काही कोट्यवधींची उलाढाल करण्याची क्षमता सोमाटणे नर्सरी हबने तयार केली आहे. कुंड्या, कोकोपीट, लाल माती, पिशव्या, शेणखत विक्री अशा पूरक व्यवसायांनाही याद्वारे चालना मिळाली आहे. या व्यवसायात गावासह गावाबाहेरील तरुणांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रति नर्सरीधारकाकडे पाच ते दहा वा काही वेळा त्याहून अधिक मजूर काम करतात. प्रति दिन ४०० ते ५०० रुपये मजुरी मिळते.
ग्रामविकासातही आघाडी
सोमाटणे गावाने ग्रामविकासातही आघाडी घेतली आहे. महिलांना नर्सरी व्यवसायासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शेतीमाल प्रक्रिया, भरड धान्य प्रक्रिया, केक, बिस्किटे, एम्ब्रॉयडरी आदींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे नर्सरी व्यवसायाबरोबरच अन्य पूरक व्यवसायांनाही गावात चालना मिळत आहे.
वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन
गावात वड, पिंपळ, लिंब आदी रोपांची लागवड आहे. गावातील डोंगरावर असलेल्या श्री चौराई देवीमुळे डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. गावात दररोज स्वच्छता केली जाते. दर रविवारी गावातील काही समाजसेवकांचेही त्यासाठी योगदान असते. प्लॅस्टिक बंदीही घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबत गावाच्या स्वच्छतेलाही महत्त्व दिले जात आहे.
‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल
पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, करवसुली, सुविधा, पर्यावरण सौंदर्य, संतुलित आरोग्य आदींसह महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात सोरतापवाडी आघाडीवर आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमुळे गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल केली आहे.
बदलत्या काळानुसार व्यवसायात बदल
गावाने ‘नर्सरी’ व्यवसायात चांगलीच भरारी घेतली आहे. ‘ग्रामसमृद्धीत आमच्या गावाची झालेली निवड ही अभिमानाची बाब आहे. ग्रामस्थ, शासकीय पातळीवरील निधी, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत आदी सर्वांचे योगदान त्यामागे कारणीभूत आहे. ग्रामस्थांनी बदलत्या काळानुसार व्यवसायात बदल केला आहे. पुणे शहराच्या आसपास हडपसर ते यवत या मुख्य महामार्गालगतच्या नर्सरींमध्ये सर्वाधिक व्यावसायिकांबरोबरच आता सोमाटणे गावातही उद्योजक वाढले आहेत,’ अशी भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतीच्या पारंपरिक वाटेवरून बदलत्या बाजारपेठेची गरज ओळखत सोमाटणेने रोपवाटिका व्यवसायाला स्वीकारले असून, आज हे गाव ‘नर्सरी हब’ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.