पिंपरी, ता. ८ : ‘‘दमदार आवाज, अभिनय आणि सडेतोड व्यक्तिमत्त्वाने चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर हे माणूस म्हणूनदेखील तितकेच ‘ग्रेट’ होते. त्यांच्या निधनाने केवळ चित्रपटसृष्टीचेच नव्हे, तर सामाजिक क्षेत्राचाही आधार हरपला आहे,’’ अशा शब्दांत शहरातील विविध मान्यवरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नाना पाटेकरांनी आपल्या कर्तृत्वाने अशी उंची गाठली होती, की प्रत्येकाने त्यांचे नाव आदरानेच घ्यावे. महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीवर परखडपणे भूमिका घेणारे कलावंत म्हणजे नाना होत. यशाच्या शिखरावर पोहोचूनही नानांनी आपले साधेपण सोडले नाही.
- भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा
नाना पाटेकर यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. एक सच्चा हरहुन्नरी देशप्रेमी कलाकार जाणे हे आपल्या सर्वांचे नुकसान आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील व प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. त्यांनी दमदार अभिनयाची छाप उमटवली.
- अमित गोरखे, आमदार तथा अध्यक्ष, कलारंग संस्था
‘क्रांतिवीर’ सिनेमासाठी नाना पाटेकर यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. त्याच वर्षी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ‘मोरूची मावशी’ नाटकासाठी ‘बेस्ट ॲक्टर अवॉर्ड’ नानांच्या हस्ते मिळाला होता, त्याचा मला विशेष आनंद झाला होता. अभिनेता आणि माणूस म्हणून नाना ‘ग्रेट’ होते. कायम स्मरणात राहतील.
- डॉ. संजीवकुमार पाटील, ज्येष्ठ नाट्यकर्मी
अत्यंत साधेपणाने राहून नानांनी ‘नाम फाउंडेशन’सारख्या समाजोपयोगी चळवळीची निर्मिती करून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सहज सुंदर अभिनय कसा असतो, हे नवीन पिढीतील कलाकारांनी नानांच्या अभिनयातून शिकावे. नाना पाटेकरांसारखा मनस्वी कलाकार पुन्हा होणे नाही
- किरण येवलेकर, अभिनेता तथा दिग्दर्शक
अतिशय स्पष्ट, सडेतोड; परंतु निर्मळ मनाचा माणूस म्हणजे नाना पाटेकर. ‘पाहिजे जातींचे’ नाटकातील ‘बबन्या’ असो किंवा सिनेमातील विविध प्रकारच्या भूमिका, नानांनी त्यांची पूर्ण छाप पाडली आहे. लहानपासून थोरापर्यंत त्यांना एकेरी नावात हाक मारत. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे.
- सुहास जोशी, कार्यवाह, अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड
नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट पाहिले. त्यांच्या अभिनयाला तोड नाही. ‘नाम’च्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली जलसंधारण चळवळीचे काम लाखमोलाचे आहे. त्यांच्या रुपाने अभिनय सम्राट, नटसम्राट, एक समाजसेवक आज आपल्यातून गेले आहेत. पण, त्यांचे विचार कायम आपल्याला मार्गदर्शन करतील.
- सुरेश कंक, पिंपरी चिंचवड साहित्य मंच
कारगिल युद्धावेळी तब्बल ६० दिवस नाना त्या परिसरात मुक्कामी होते. भारतीय लष्कराला सर्वतोपरी मदत करत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून अनेक मूलभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या.
- सुरेश लुणावत, विकासनगर, किवळे
‘अभिजात मराठी’ कार्यक्रमात श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आयोजित केला आहे. त्याअंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाना पाटेकर यांना रसिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचे आणि सामाजिक कार्याचे उपस्थितांनी स्मरण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.