आराधना शक्तीच्या नवदुर्गेची
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
आपल्या संस्कृतीत देवदेवतांच्या उत्सवांमध्ये नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. आदिशक्तीच्या भक्तीचा आणि उपासनेचा हा उत्सव शरद ऋतूत येत असल्याने त्याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. या नऊ दिवसांत देवीने विविध रूपे धारण करून दुष्टांचा नाश आणि सज्जनांचे रक्षण केल्याची मान्यता आहे. नवदुर्गेच्या नऊ रूपांची आराधना करताना शक्ती, ज्ञान, समृद्धी, संयम आणि सद्गुणांची उपासना केली जाते. भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.
---------------
आ पल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानाची देवता सरस्वती, धन आणि समृद्धीची देवता लक्ष्मी, तर शक्ती आणि सामर्थ्याची देवता दुर्गा मानली जाते. या देवतांचे महत्त्व आजही अबाधित आहे. शक्ती आणि सामर्थ्याची आराधना म्हणजेच नवरात्रोत्सव होय. शक्तीची उपासना प्राचीन काळापासून केली जाते. मूळ आदिशक्तीला दुर्गा असे म्हणतात. या दुर्गेने मानवाच्या कल्याणासाठी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी तीन रूपे धारण केली. ही तीन रूपे त्रिगुणांशी संबंधित मानली जातात.
देवी दुर्गेची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे आहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा आणि भवानी ही तिची सौम्य रूपे, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी आणि चामुंडा ही उग्र रूपे आहेत. महाकाली हे देवीचे उग्र रूप असून ती तमोगुणाचे प्रतीक मानली जाते. ती दैत्यांचा संहार करते. महालक्ष्मी हे राजस रूप असून ते वैभव आणि संपत्तीचे प्रतीक आहे. महासरस्वती हे देवीचे सात्त्विक रूप आहे. ब्राह्मी, वराही, महेश्वरी, इंद्राणी, चामुंडा, वैष्णवी, चंडिका आणि कौमारी या देवीच्या अष्टशक्ती मानल्या जातात.
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवीच्या तीन प्रमुख रूपांशी नवदुर्गेची नऊ रूपे संबंधित आहेत. या तीन प्रमुख रूपांमध्ये प्रत्येकी आणखी दोन रूपांचा समावेश होऊन नवदुर्गेची संकल्पना तयार झाल्याचे मानले जाते. त्यामुळे शक्तीच्या उपासनेत नऊ या अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्ती ही परब्रह्मस्वरूप असल्यामुळे नऊ या संख्येला परब्रह्म संख्या असेही म्हटले जाते. नवरात्रात शक्तीने धारण केलेल्या नऊ रूपांची नऊ दिवस उपासना करून देवीची आराधना केली जाते.
१) शैलपुत्री
आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी, नवदुर्गांमधील पहिली देवता शैलपुत्री हिचे पूजन केले जाते. पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव प्राप्त झाले. तिचे वाहन वृषभ म्हणजेच बैल आहे. देवीच्या एका हातात त्रिशूळ, तर दुसऱ्या हातात कमळ असते. तिच्या मस्तकावर चंद्रकोर विराजमान असते. नवरात्रातील उपासनेचा प्रारंभ शैलपुत्री दुर्गामातेच्या पूजनाने केला जातो. तिच्या पूजनातून भक्ती, स्थैर्य आणि सामर्थ्याची प्रेरणा घेतली जाते.
२) ब्रह्मचारिणी
नवरात्रातील दुसऱ्या दिवशी दुर्गामातेच्या दुसऱ्या स्वरूपाचे, म्हणजेच ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केले जाते. ब्रह्मचारिणी या शब्दातील ‘ब्रह्म’ म्हणजे तपश्चर्या किंवा तपस्या, तर ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी तपस्विनी. दुर्गामाता या स्वरूपात अत्यंत तेजस्वी आणि दिव्य रूपात दर्शन देते. तिने उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण केले आहे. तिचे हे रूप संयम, साधना, श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेतून साधकाला तपश्चर्येची आणि ध्येयाप्रति समर्पित राहण्याची प्रेरणा मिळते.
३) चंद्रघंटा
दुर्गामातेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराची अर्धचंद्राकृती आकृती असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे नाव पडले. या दिवशी तिचे रूप शांतिप्रद आणि कल्याणकारी मानले जाते. देवी दशभुजा असून तिच्या हातांत खड्ग, बाण आणि विविध शस्त्रास्त्रे आहेत. तिच्या शरीराचा वर्ण सोन्याप्रमाणे चमकदार आहे. ती सिंहावर आरूढ असते. तिची मुद्रा युद्धासाठी सज्ज असल्याचा भाव दर्शवते. चंद्रघंटा देवीचे हे रूप शौर्य, धैर्य आणि संकटांचा सामना करण्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
४) कुष्मांडा
आश्विन शुद्ध चतुर्थी हा नवरात्रातील चौथ्या माळेचा दिवस होय. या दिवशी दुर्गेची कुष्मांडा स्वरूपात पूजा केली जाते. कुष्मांडा म्हणजे कोहळा. चंडीहोमामध्ये आहुती देताना देवीला कोहळ्याचा हळवा, म्हणजेच आतील मऊ भाग प्रिय असल्यामुळे तिला कुष्मांडा असे नाव पडल्याची मान्यता आहे. कुष्मांडा ही सृष्टीची आदिरूप शक्ती मानली जाते. तिने ब्रह्मांडाची निर्मिती केली असून तिचा निवास सूर्यमंडळाच्या आतील लोकात असल्याचे मानले जाते. कुष्मांडा देवीच्या शरीराची कांती आणि प्रभा सूर्याप्रमाणे देदीप्यमान असते. तिच्यामुळेच दाही दिशा प्रकाशमान होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. ती अष्टभुजा असून तिच्या हातांत कमंडलू, धनुष्य, बाण, चक्र, कमळ आणि जपमाळ यांसह विविध अस्त्रे व आयुधे आहेत. तिच्या उपासनेतून सृष्टीच्या निर्मितीतील शक्ती, तेज आणि चैतन्य यांचे स्मरण केले जाते.
५) स्कंदमाता
ललिता पंचमीच्या दिवशी दुर्गामातेच्या स्कंदमाता या स्वरूपाची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेय. स्कंदाची माता असल्यामुळे या दुर्गामातेला स्कंदमाता असे नाव प्राप्त झाले. ती षण्मुख स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेली असते. ती चतुर्भुज असून सिंह हे तिचे वाहन आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत कमळ असते. तिचा वर्ण शुभ्र आहे. काही ठिकाणी ती पद्मासनावर विराजमान असल्याचे स्वरूपही आढळते.
स्कंदमाता ही योगसाधकांच्या तपश्चर्येशी संबंधित देवता मानली जाते. तिची उपासना केल्याने परमसुख आणि शांती प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी ललिता सहस्रनामाचे पठण, पाटावर केलेली कुंकुमार्चना आणि देवीची विशेष पूजा केली जाते. या पूजेमुळे सौभाग्य आणि वैभव प्राप्त होते, अशी मान्यता आहे. ललिता पंचमीच्या दिवशी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी त्र्यंबोली देवीला भेटायला जाते, अशी परंपरा आहे. त्यामुळे नवरात्रातील हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.
६) कात्यायनी
देवीचे सहावे रूप कात्यायनी म्हणून प्रसिद्ध आहे. आश्विन शुद्ध षष्ठीच्या दिवशी तिची पूजा केली जाते. सर्व देवतांच्या सामूहिक तेजातून या देवीची निर्मिती झाली, अशी मान्यता आहे. महर्षी कात्यायन हे भगवतीचे निष्ठावंत उपासक होते. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे देवीने त्यांच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. त्यामुळे तिला कात्यायनी असे नाव प्राप्त झाले.
आश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तिचा जन्म झाल्याचे वर्णन काही परंपरांत आढळते. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी ऋषींनी तिचे पूजन केले. त्यानंतर दशमीला तिने महिषासुर राक्षसाचा वध केला, अशी धार्मिक कथा आहे. त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. देवीचा वर्ण सोन्यासारखा असून ती चतुर्भुज आहे. तिच्या हातांत खड्ग आणि कमळ आहे. सिंह हे तिचे वाहन आहे. कात्यायनी देवीचे स्वरूप अन्यायाविरुद्ध लढण्याचे, दुष्टांचा नाश करण्याचे आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते.
७) कालरात्री
आश्विन शुद्ध सप्तमी हा नवरात्रातील सातवा दिवस असून या दिवशी दुर्गामातेच्या कालरात्री या स्वरूपाची पूजा केली जाते. नवदुर्गांमधील हे सर्वांत भयंकर स्वरूप मानले जाते. तिचा वर्ण अंधाराप्रमाणे काळाकभिन्न आहे. तिच्या गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ असते. तिचे केस विस्कटलेले असून तिला भेदक असे तीन गोल डोळे आहेत. तिच्या श्वासातून अग्नीज्वाळा बाहेर पडत असतात. गाढव हे तिचे वाहन आहे.
कालरात्रीचे रूप उग्र असले, तरी ती आपल्या उपासकांना सर्वोत्तम फळ देणारी आणि शुभ करणारी असल्यामुळे तिला शुभंकर असेही म्हटले जाते. तिच्या उपासनेतून भयावर मात करण्याची, संकटांना सामोरे जाण्याची आणि अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा मिळते. कालरात्री देवी अक्षय पुण्य प्रदान करणारी आहे, अशी श्रद्धा आहे.
८) महागौरी
नवरात्रातील महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी. या दिवशी दुर्गामातेच्या आठव्या शक्तीचे, म्हणजेच महागौरीचे पूजन केले जाते. ‘अष्टवर्षा भवेत् गौरी’ या वचनानुसार अष्टमीच्या दिवशी आठ वर्षांच्या कुमारीचे महागौरी म्हणून पूजन केले जाते. महागौरी चतुर्भुज आहे. तिच्या दोन हातांत त्रिशूळ आणि अभयमुद्रा, तर अन्य दोन हातांत डमरू आणि वरप्रदानाची मुद्रा असते.
महागौरीची मुद्रा शांत असून ती त्वरित फल देणारी शक्ती मानली जाते. या दिवशी घागर फुंकण्याची आणि महालक्ष्मीच्या पूजेची परंपरा काही ठिकाणी आढळते. महागौरीच्या उपासनेमुळे पूर्वसंचित पापांचा नाश होतो आणि दैविक दुःखांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तिचे हे स्वरूप पावित्र्य, शांती, करुणा आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते.
९) सिद्धिदात्री
नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे महानवमी. या दिवसाला खंडेनवमी असेही म्हणतात. शस्त्रपूजनासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. दुर्गेची नववी शक्ती सिद्धिदात्री या स्वरूपात पुजली जाते. आपल्या उपासकांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी म्हणून तिला सिद्धिदात्री असे नाव प्राप्त झाले आहे.
सिद्धिदात्री देवी सिंहवाहिनी किंवा कमळावर विराजमान असलेल्या स्वरूपात दिसते. ती चतुर्भुज असून तिच्या हातांत शंख, चक्र, गदा आणि कमळ असते. ती भक्तांना सिद्धी प्रदान करणारी, अमृतत्वाकडे घेऊन जाणारी, सुखदायी आणि मोक्षदायी मानली जाते.
समाजात दुर्वृत्ती बळावून दुष्ट आणि दुर्जन उन्मत्त होतात, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी शक्ती प्रकट होते, अशी धार्मिक संकल्पना आहे. ही शक्ती दुष्टांचे निर्दालन करून सज्जनांचे रक्षण करते आणि जगाच्या कल्याणासाठी कार्य करते. म्हणूनच नवरात्रात महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांच्या स्वरूपातील नवदुर्गेची उपासना केली जाते. या उपासनेतून सामर्थ्य, ज्ञान, समृद्धी, सदाचार आणि धर्मरक्षणाचा संदेश मिळतो.
नवरात्रोत्सव हा शक्तीच्या उपासनेचा आणि भक्तिभावाचा उत्सव आहे. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून देवीची आराधना केली जाते. नवदुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन करताना जीवनात शक्ती, ज्ञान, संयम, समृद्धी आणि सद्गुण यांचा स्वीकार करण्याची प्रेरणा मिळते. देवीच्या उपासनेतून दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून सज्जनतेचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.