पिंपरी, ता. १३ : अवघ्या जणांच्या आवडीचा, सामाजिक एकोप्याचा आणि आनंदाची लयलूट करणारा गणेशोत्सव सोमवारपासून (ता.१४) सुरू होत आहे. यानिमित्त घरोघरी आणि मंडळांनी सजवलेल्या मांडवांमध्ये श्री गणेशाचे आगमन होत आहे. त्यानंतर आगामी बारा दिवस हर्षोल्हासाची उधळण या उत्सवानिमित्त होणार आहे. यानिमित्त रविवारी रात्री उशिरापर्यंत घरोघरी सजावटीची लगबग सुरू होती. सार्वजनिक मंडळांनीही गणपती प्रतिष्ठापनेसाठी जय्यत तयारी केली आहे.
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून रविवारी रात्रीपर्यंत तयारी सुरू होती. मांडव आणि देखावे उभारणीसाठी कार्यकर्ते तल्लीन झाले आहेत. गणेशमूर्तीसह भव्य सभामंडप, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह पौराणिक आणि सद्य:स्थितीवर आधारित आरास करण्यात आली आहे.
श्रींच्या आगमन मिरवणुकीसाठी रथ सजवण्यात आले आहेत. ढोल-ताशा पथकेही मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
पोलिसांकडूनही नियोजन
श्री गणेश आगमन सोहळ्याच्या नियोजनासाठीही पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. तर, वाहतूककोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांत बदल केले आहेत. गणेशोत्सव काळात अवजड वाहनांना शहरात बंदी घातली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
रविवारच्या दिवसभरातील क्षणचित्रे
- गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अनेकांनी रविवारी (ता.१३) सुट्टीचा मुहूर्त साधत खरेदीचा उत्साह
- शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी
- लाडक्या गणरायासाठी आरास, पूजेचे साहित्य, फुले, विद्युत रोषणाईचे साहित्य खरेदीसाठी झुंबड
- अनेक नागरिक खरेदीसाठी वाहन घेऊन आल्यामुळे पिंपरी बाजारात रांगा
- काही भागांत वाहतूक कोंडी
- मंडळांच्या परिसरात कार्यकर्त्यांची लगबग
- ढोल-ताशा पथकांकडून नियोजन, सज्जता
हरितालिकेच्या पूजेसाठीही खरेदी
भाद्रपद शुद्ध तृतीया अर्थात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका पूजन केले जाते. यंदा गणेश चतुर्थी आणि हरितालिका एकाच दिवशी सोमवारी (ता.१४) आली आहे. तिचा मुहूर्त सकाळी सात वाजेपर्यंत आहे. त्या पूजेसाठी लागणारी पत्री, नागवेलीची पाने, पाच फळे, दुर्वांची जुडी आदी खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत महिलांची गर्दी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.