पिंपरी-चिंचवड

म्हणे, इंद्रायणीचे पाणी ‘समाधानकारक’!

CD

पिंपरी, ता. १६ : इंद्रायणीसह पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांच्या प्रदूषणाची पातळी ‘समाधानकारक’ असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदविला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात मास्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. हा प्रकार नदीच्या अतिप्रदूषणामुळे झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. शिवाय, शहरात निर्माण होणारे जवळपास पन्नास टक्के सांडपाणी व मैलापाणी विविध नाल्यांद्वारे इंद्रायणीसह अन्य नद्यांमध्येही मिसळत आहे. असे असताना, केवळ ‘एसटीपी’ (सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प) आणि ‘ईटीपीं’ची (औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र) आकडेवारी मांडून महापालिका नागरिकांची बोळवण करत असल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

नदी किनाऱ्यांलगतची वाढती वस्ती, अनधिकृत बांधकामे, अपुरी मलनि:स्सारण व्यवस्था, बंद खासगी ‘एसटीपी’ आणि नाल्यांमधून वाहणारे मैलामिश्रित पाणी यामुळे नद्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदीकाठावर दुर्गंधी, काळवंडलेले पाणी, फेस आणि कचरा असे दृश्य नेहमीचेच झाले आहे. त्यात इंद्रायणीतील माशांच्या मृत्यूने जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची स्थिती आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, दररोज ५०१ एमएलडी (दशलक्ष लिटर) सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, प्रत्यक्ष नदीत मिसळणारे मैलापाणी, अपुऱ्या क्षमतेने चालणाऱ्या यंत्रणा, पावसाळ्यात वाढणारा प्रवाह आणि बंद खासगी एसटीपींचा हिशेब या अहवालात नाही. तसेच, शहरातील अनेक भाग अद्यापही सांडपाणी वाहिन्यांना पूर्णपणे जोडलेले नाहीत. अशा ठिकाणचे सांडपाणी नाल्यांमधून पुढे नदीतच पोहोचते. त्यामुळे ‘५०१ एमएलडीवर प्रक्रिया’ असा दावा महापालिकेचा असला, तरी नद्यांतील पाणी समाधानकारक असल्याचा निष्कर्ष प्रत्यक्ष परिस्थितीला धरून नसल्याची टीका होत आहे.

सांडपाणी नाल्यांमधून ‘इंद्रायणी’त
शहरातील १२ नाले इंद्रायणी नदीला मिळतात. त्यांद्वारे येणाऱ्या सांडपाण्याची गुणवत्ता, प्रवाहाचे प्रमाण आणि त्यातील जैविक-रासायनिक प्रदूषकांची तपासणी नियमितपणे केली जाते का? याचे उत्तर मिळत नाही. नदीप्रदूषण रोखण्यासाठी नाल्यांच्या तोंडावर सांडपाणी अडवून ते ‘एसटीपी’पर्यंत नेणे अपेक्षित आहे. मात्र, ही यंत्रणा अनेक ठिकाणी अपुरी पडत असल्याचे नदीपात्रातील स्थिती सांगते.

‘पीएच’ समाधानकारक; ‘बीओडी’ची चिंता
महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार, इंद्रायणीतील पाण्याचा पी.एच. (पॉवर ऑफ हायड्रोजन) स्तर समाधानकारक आहे. मात्र, ‘बीओडी’चे (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) प्रमाण निर्धारित मानकापेक्षा अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. म्हणजेच नदीत सेंद्रिय कचरा, मैलापाणी व सांडपाण्याचा भार वाढल्याचे दिसते. यामुळे पाण्यातील सेंद्रिय घटकांचे विघटन करण्यासाठी अधिक ऑक्सिजन खर्च होत असल्याने जलचरांसाठी आवश्यक ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे.

इंद्रायणी नदीतील पाण्याचे २२ ठिकाणी तीन ऋतूंत परीक्षण केले. त्यानुसार प्रवाहातील पाणी गंभीररीत्या प्रदूषित झाले आहे. उगमाकडील भागात पाणी गुणवत्ता निर्देशांक (डब्ल्यूक्यूआय) ५० पेक्षा कमी अर्थात ‘चांगला’ आहे. मात्र, तळेगाव, चाकण, पिंपरी चिंचवड या शहरी व औद्योगिक पट्ट्यानंतर तो २५० ते ३०० पेक्षा अधिक नोंदविला गेला. काही ठिकाणी तो ४०७ पर्यंतही पोहोचला आहे.
- किरण घोटकुळे, पर्यावरण अभ्यासक

नद्या प्रदूषित होण्याचे मुख्य कारण हे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडणे हे आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकांमध्येही जनजागृती होणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही गेली ८-१० वर्षे महापालिकेला उपाययोजना करण्याबाबत सूचना व विनंती करत आलो आहोत. मात्र, त्यावर अद्याप योग्य कार्यवाही झालेली नाही
- गणेश बोरा, पर्यावरणप्रेमी

पाणी प्रदूषण कमी करण्याबाबत महापालिका उपाययोजना करत आहे. सद्यःस्थितीत इंद्रायणीसह मुळा व पवना या नद्यांवर २१ एसटीपी कार्यरत आहेत. बोपखेल येथील एसटीपी सुरू केला जाणार आहे. तसेच १२ एसटीपी प्रस्तावित आहेत. त्यामुळे नदीत जाणारे पाणी बऱ्यापैकी कमी करण्यास यश येईल.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

सांडपाण्याच्या दाव्यांचे गणित
तपशील / प्रमाण (एमएलडी)
प्रतिदिन निर्माण सांडपाणी / ५२० ते ५४१
महापालिका एसटीपीत प्रक्रिया / ४१८
खासगी एसटीपीमधील प्रक्रिया / ८३
एकूण प्रक्रियेचा दावा / ५०१
आकडेवारीतील तफावत / १९ ते ४०
(वास्तवात सांडपाणी मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये मिसळत आहे)

महापालिका एसटीपी
कार्यान्वित ः २६
प्रस्तावित ः १२

दृष्टिक्षेपात ईटीपी
महापालिका ः ७
खासगी ः ३५५

खासगी एसटीपी
एकूण ः ४९४
कार्यान्वित ः ३६९
अकार्यान्वित ः १२५
प्रस्तावित ः ७९३
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT