पिंपरी, ता. ७ : पूर्वी एखादी घटना घडली की लोक त्या प्रसंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आणि गरज पडल्यास मदतीला धावून जात. मात्र, आता परिस्थिती बदलत चालली आहे. सण-उत्सव, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक सोहळे, पर्यटनस्थळे, अपघात किंवा भांडण यांसारख्या प्रसंगी अनेकजण परिस्थिती समजून घेण्याऐवजी मोबाईल काढून फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात व्यस्त दिसतात. शहरात अनेक ठिकाणी असे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि ‘लाइक्स’ व ‘व्ह्यूज’ मिळवण्याची स्पर्धा यामागे दिसून येते.
मोबाइलचा वापर हा गरजेनुसार आणि मर्यादित असणे आवश्यक आहे. एखादा प्रसंग घडला तर त्याचे चित्रीकरण करण्यापेक्षा प्रथम परिस्थिती समजून घेऊन गरजूंना मदत करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. पालकांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मोबाइलच्या योग्य वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
मदतीऐवजी फोटो काढण्याची स्पर्धा
अपघाताच्या घटनांमध्ये ही बाब अधिक गंभीर स्वरूपात दिसून येते. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तींना तातडीने मदत करण्याची गरज असताना काही लोक मोबाइलमध्ये व्हिडिओ काढण्यात मग्न असतात. त्यामुळे मदत मिळण्यास उशीर होतो आणि मानवी संवेदनशीलतेबाबत प्रश्न उपस्थित होतात. समाजात परस्पर सहकार्य आणि मदतीची भावना कमी होत असल्याचेही यावरून दिसून येते.
आरोग्यावर परिणाम
मोबाइलच्या अतिवापरामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. सतत मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, डोकेदुखी, झोपेचा अभाव, मानसिक ताण आणि एकाग्रतेत घट यांसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये मोबाइलचा अतिरेक अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे अभ्यास, क्रीडा आणि इतर सर्जनशील उपक्रमांकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
अपघाताच्या घटना
रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. सेल्फी काढण्याच्या नादात किंवा व्हिडिओ बनवताना अनेक दुर्घटना घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काही वेळा लोहमार्गावर, धोकादायक ठिकाणी किंवा गर्दीच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळे जिवावर बेतणाऱ्या घटना घडत आहेत.
उदाहरणे
- निगडी-देहूरोड मार्गावर एका पीएमपी बसने मोटारीला धडक दिल्याने मोटारीने दोन ते तीन पलटी मारल्या. त्या मोटारीत तीन तरुण होते. अपघात घडताच रस्त्यावरील इतर वाहनेही थांबली. प्रथमतः मोटारीतील तिघांना बाहेर काढून त्यांची विचारपूस करणे आवश्यक होते. मात्र, काहीजण ते न करता मोबाइलमध्ये अपघातग्रस्त वाहनाचे फोटो टिपत होते.
- दोन दिवसांपूर्वी देहूत श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा पार पडला. हा सोहळा डोळ्याने पाहण्याआधीच अनेकजण हातात उंचावर मोबाईल धरून चित्रीकरण करण्यात मग्न होते.
‘‘डिजिटल साधने जीवन अधिक सोईस्कर करण्यासाठी आहेत. मात्र, त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम समाजावर आणि व्यक्तीच्या आरोग्यावरही होऊ शकतात. त्यामुळे मोबाइलचा योग्य वापर करत वास्तवातील प्रसंग प्रत्यक्ष अनुभवण्याची सवय लावणे ही काळाची गरज आहे.
- सुनील राजेभोसले, नागरिक
PNE26W01504
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.