श्रावण जाधव : सकाळ वृत्तसेवा
मोशी : पुणे-नाशिक महामार्गावर चाकणकडून येताना टोल नाक्यापुढील सिग्नल, देहू-आळंदी बीआरटी रस्ता, भारतमाता चौक सिग्नल, जुना आळंदी चौक सिग्नल, श्री नागेश्वर महाराज उपबाजार चौक सिग्नल व राजा शिवछत्रपती चौक सिग्नल येथे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, रुग्णवाहिका चालकांसह रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी ही केवळ पोलिसांची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिक, वाहनचालक आणि पोलिस यांनी मिळून शिस्त पाळल्यासच हा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा दररोजचा प्रवास म्हणजे त्रास, वेळेची नासाडी आणि अपघातांना आमंत्रण ठरणार आहे.
वाहतूक कोंडीची कारणे
- अनेक दुचाकीस्वार व रिक्षाचालक लाल सिग्नल असतानाही झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन थेट चौकाच्या मध्यभागी थांबतात. ‘मी आधी जाणार’ या मानसिकतेतून चौकात चारही दिशांनी वाहने एकत्र येतात आणि काही मिनिटांत संपूर्ण चौक जाम होतो
- वाहतूक दिव्यांचे नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जात आहेत. सिग्नल सुटण्याआधीच वाहनचालक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना मार्ग मिळत नाही आणि गोंधळ वाढतो.
- वाहतूक पोलिसांकडून होणारी अपुरी कारवाई. अनेक वेळा नियमभंग होत असतानाही पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेतात. कठोर दंडात्मक कारवाई न झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये नियमांबाबत जागृती उरलेली नाही.
उपाययोजना काय?
पोलिसांचे कर्तव्य : चौकांमध्ये सतत पोलिस उपस्थित असणे, सिग्नल तोडणाऱ्यांवर तत्काळ दंड आकारणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक
वाहनचालकांचे कर्तव्य : लाल सिग्नल असताना झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच थांबणे, चौकात अडथळा निर्माण न करणे, ‘मी आधी जाणार’ ही मानसिकता सोडून संयम राखणे गरजेचे आहे.
नागरिकांकडून अपेक्षा : नियम पाळण्याबाबत जागृती करणे, सोशल मीडियाद्वारे तसेच थेट प्रशासनाकडे तक्रारी नोंदवणे, वाहतूक शिस्तीसाठी सहकार्य करणे महत्त्वाचे
राजा शिवछत्रपती चौकामध्ये स्पाइन रस्ता, भोसरी व मोशीकडून येणाऱ्या शेकडो वाहने खडी मशीनमार्गे चऱ्होलीकडे जातात. हा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने या रस्त्यावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची कोंडी होते. त्यामुळे आम्हा नियम पाळणाऱ्यांचा वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो.
- कुणाल भुजबळ, चऱ्होली
पुणे-नाशिक महामार्गावर चाकणकडून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. भारतमाता चौकामध्ये देहू आणि आळंदीकडून येणाऱ्या वाहन चालकांकडून शिस्त पाळली जात नाही. दोन्ही बाजूंनी झेब्रा क्रॉसिंग दिसत नसल्याने काही वाहनचालक सरळ चौकात येऊन थांबतात आणि कोंडी होते.
- दिनेश पाटील, वाहनचालक, मोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.