पिंपरी, ता. ४ : ‘‘शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन व विनामूल्य राबविण्यात येत आहे,’’ असा दावा महापालिका शिक्षण विभागाने सोमवारी केला. मग, ४० हजार रुपयांची लाच घेताना राजकीय कार्यकर्ता कसा सापडला?, शिक्षण विभागाला आता जाग आली का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी आणि आकुर्डी अशी दोन केंद्र आहेत. त्यांच्यावर महापालिका शिक्षण विभागाचे नियंत्रण आहे. मात्र, ‘आरटीई’तून प्रवेश मिळवून देण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला गेल्या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे ‘आरटीई’ प्रवेशात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे दिसते आहे. याबाबत ‘आरटीई’अंतर्गत लाचखोरीचे रॅकेट?’ असे वृत्त ‘सकाळ’ने सोमवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिका शिक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दावा केला आहे.
महापालिका शिक्षण विभागाचे म्हणणे...
- ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही
- अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, संगणकीय लॉटरी, प्रवेश निश्चितीसाठी कोणताही मध्यस्थ किंवा व्यक्तीची आवश्यकता नसते
- ‘आरटीई’ अंतर्गत कोणालाही पैसे देऊन प्रवेश मिळवता येत नाही
- कोणीही पैसे देऊन प्रवेश मिळेल असे सांगत असल्यास ते दिशाभूल करणारे आहे
महापालिकेच्या दाव्यांतून लाचखोरीची कबुलीच?
- काही ठिकाणी ‘आरटीई’ प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे
- काही व्यक्ती स्वतःला शाळेशी किंवा शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचे भासवून, प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवत आहेत
- पैसे मागणे किंवा देणे हे पूर्णतः बेकायदेशीर असून यामुळे पालकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
अशी होते प्रवेश प्रक्रिया
- ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आधारित आहे
- संगणकीय पद्धतीने सोडत (लॉटरी) काढून विद्यार्थ्यांची निवड केली जाते
- अर्जाची पडताळणी केवळ सादर केलेल्या कागदपत्रांवर आधारित असते
पालकांनी घ्यायची काळजी
- कोणताही एजंट, मध्यस्थ किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये
- प्रवेश प्रक्रियेसाठी कोणालाही रोख, ऑनलाइन किंवा इतर कोणत्याही स्वरुपात पैसे देऊ नयेत
- केवळ शासनाच्या अधिकृत आरटीई पोर्टलवरूनच अर्ज करावा, त्याची स्थिती स्वतः तपासावी
- कागदपत्र पडताळणी करताना संबंधित शाळा किंवा अधिकृत केंद्रातच उपस्थित राहावे
- अधिकृत पावतीशिवाय कोणतीही रक्कम देऊ नये
लाच मागत असल्यास...
- कोणी लाच किंवा पैशांची मागणी केल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी
- शक्य असल्यास संबंधित संभाषण, कागदपत्रे किंवा अन्य पुरावे जतन करून सादर करावेत
- तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, संगणकीकृत व शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येत आहे. यात कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीला स्थान नाही. पालकांनी अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करावा. कोणत्याही आमिषांना बळी पडू नये. प्रवेशासाठी पैसे मागणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केली जाईल.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.