पिंपरी, ता. ६ ः शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य टिकवून ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, काम करताना त्यांना आरोग्यविषयक धोके, साधनांची कमतरता आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्या प्रशासनाने तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडवा, असा आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी प्रशासनाला दिला.
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत त्यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. महापौर रवी लांडगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे यांच्यासह कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या.
डागोर यांच्या हस्ते काही कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. डागोर म्हणाले, ‘‘सफाई कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने विविध धोरणे राबवली आहेत. मात्र, या योजनांचा लाभ प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत. वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विविध योजनांचा लाभ विनाअडथळा मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.’’
सफाई कर्मचारी आयोगाचे आदेश
- धन्वंतरीसारख्या वैद्यकीय विमा योजनांचा लाभ द्यावा
- पदोन्नतीसंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत
- अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या वेळेत पूर्ण कराव्यात
- लाड-पागे समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी
- निवास, वेतन आणि इतर प्रश्नांसाठी समिती स्थापन करावी
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महापालिका विविध योजना राबवीत आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न, तांत्रिक व प्रक्रियात्मक अडचणी सोडविण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित सर्व शासन निर्णय आणि परिपत्रकांचा सखोल अभ्यास करून निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान केली जात आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.