रावेत, ता. ३१ : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रावेत-किवळे-मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मध्ये मोरेश्वर भोंडवे आणि जयश्री भोंडवे या दांपत्यास उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. पक्षाचे समर्थक आणि निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेवक प्रज्ञा खानोलकर आणि मयुरेश खानोलकर, बापू कातळे यांनी बंडखोरीचे अस्त्र उपसले आहे. यामुळे भोंडवे दांपत्य अडचणीत येऊन या प्रभागातील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक मनोज खानोलकर आणि त्यांचे कुटुंबीय पक्षाच्या भूमिकेमुळे कमालीचे संतप्त झाले आहेत. ‘आमचे कुटुंब गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे समाजसेवेत कार्यरत आहे. कठीण काळातही आम्ही कधी पक्षाची साथ सोडली नाही. मात्र, आज पैशाच्या जोरावर एकाच घरात दोघांना उमेदवारी देऊन पक्षाने आमच्या निष्ठेची थट्टा केली आहे,’ अशी तीव्र प्रतिक्रिया खानोलकर कुटुंबाने व्यक्त केली.
दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रवादीच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या बापू कातळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ‘आमचे जनसंपर्क कार्यालय गेल्या तीन दशकांपासून जनतेसाठी २४ तास खुले आहे. आम्ही जात-धर्म न पाहता प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेक पक्षांकडून बोलावणी असूनही आम्ही घड्याळाची साथ सोडली नव्हती. पण; पक्षाने इतक्या वर्षांची आमची सेवा विसरून धनशक्तीला प्राधान्य दिले आहे. पक्षाने आमच्या कामाची दखल न घेता नव्या लोकांना संधी दिली. हे चुकीचे झाल्यामुळे मी शिवसेनेत दाखल झालो आहे. ही लढाई आता केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती पैशाविरुद्ध खऱ्या समाजसेवेची आहे.’
अपक्षांमुळे चौरंगी लढत अटळ
पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आता प्रज्ञा खानोलकर आणि मयुरेश खानोलकर यांनी या प्रभागामधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रभागात चौरंगी लढत अटळ झाली आहे. त्याचवेळी भोंडवे दाम्पत्याची डोकेदुखी वाढली आहे.
---
महत्त्वाचे मुद्दे
प्रभाग १६ : रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, वाल्हेकरवाडी
बंडखोरी : प्रज्ञा खानोलकर आणि मयुरेश खानोलकर यांची अपक्ष उमेदवारी, बापू कातळे शिवसेनेत
कारण : मोरेश्वर भोंडवे दाम्पत्याला एकाच घरात दोन तिकिटे दिल्याने नाराजी
नाराज गट : बापू कातळे आणि खानोलकर समर्थक
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.