रावेत, ता. १७ : प्रभाग क्रमांक १६ परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, बहुतांश गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने अनेक इमारतींमध्ये वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी, नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मार्चपासून ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. सोसायट्यांना दररोज टँकर मागवावे लागत असल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे. काही भागांत महानगरपालिकेच्या योजनेतून होणारा पुरवठा अपुरा असून दिवसाआड पाणी मिळत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. अनेक वस्त्या व स्थानिक भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांना महिन्याला लाखो रुपयांचा खर्च केवळ पाण्यासाठी करावा लागत असून मेंटेनन्स वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
रावेतसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या उपनगरांत पायाभूत सुविधा वेळेवर न झाल्याने अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जलसाठा वाढवणे, नवीन पाइपलाइन टाकणे आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या उन्हाळ्यात समस्या आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रहिवासी म्हणतात...
‘‘महापालिकेचे पाणी अत्यंत कमी दाबाने येते. सकाळी काही वेळ पाणी येते; मात्र वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे टँकरशिवाय पर्याय राहत नाही.’’
- संजय पाटील, रहिवासी, शिंदे वस्ती, रावेत
‘‘दररोज पाण्याची चिंता असते. पाणी आले तरी खूप कमी येते. सोसायटीतील टाकी भरत नाही. घरातील सर्व कामे विस्कळीत होतात. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होतो.’’
- प्रिया कदम, रहिवासी, रावेत
‘‘टँकरवरील खर्चामुळे सोसायटीचे मेंटेनन्स वाढले आहे. महागाईच्या काळात हा अतिरिक्त बोजा सहन करणे कठीण झाले आहे.”
- अमोल शिंदे, रहिवासी, किवळे
---
‘‘आमच्या आठ विंगच्या सोसायटीत सुमारे दोन हजार नागरिक राहतात. दररोज सुमारे ३.५ लाख लिटर पाण्याची गरज असताना पालिकेकडून कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होतो. एसटीपी प्लांटमुळे काही प्रमाणात वापराचे पाणी मिळते; मात्र पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. टँकरवर दरमहा सुमारे चार लाख रुपये खर्च होतो. प्रशासनाने अतिरिक्त पाइपलाइन दिल्यास प्रश्न सुटू शकतो.’’
- अजय सावंत, चेअरमन, जी. के. सोसायटी
---
‘‘संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला सुमारे ७०० एमएलडी पाण्याची गरज आहे, तर सध्या ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागांत दाब कमी असला तरी पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून दिली जात आहे. अधिक तास पाणी दिल्याने नागरिकांच्या गरजा भागत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केले आहे.’’
- शरद मोरमारे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ‘ब’ प्रभाग
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.