शिरगाव, ता. १९ : पवनमावळ आणि परिसरात सध्या जनावरांचा चारा महाग झाल्याने दुग्धोत्पादन शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. पवन मावळ आणि परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी १५ ते १८ रुपये किलो दराने मिळणारी कडबा कुट्टी आता थेट २७ रुपये किलोवर पोहोचली आहे.
त्यामुळे जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस खर्चिक ठरत आहे. शिवाय चारा महाग झाल्याने त्यांना दुधात भाववाढ करता येत नाही. पवन मावळातील शिरगाव, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, गहुंजे, सांगवडे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करतात. मात्र, सध्या चाऱ्याची उपलब्धता कमी आणि भाववाढ भरमसाठ झाल्याने जनावरांना वाळलेला चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पवन मावळातील कडबाकुट्टी चालक कडबा प्रामुख्याने सोलापूर, जामखेड, बीड आदी भागांतून आणतात परंतु यावर्षी या भागात पाऊस कमी पडल्याने ज्वारीच्या पेरण्या झाल्या नाहीत आणि काही प्रमाणावर झाल्या असल्या तरी तुलनेने कमी कडबा विक्रीस उपलब्ध असेल. परिणामी, तेथील शेतकरी जुन्या साठवलेल्या कडब्यालाही वाढीव दर मागत आहेत. कडब्याच्या खरेदीचा खर्च वाढल्याने त्याचा थेट परिणाम कडबा कुट्टीच्या विक्रीवर होत आहे. दोन महिन्यांत किलोमागे तब्बल १० ते १२ रुपयांची वाढ झाल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एका बाजूला जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढत असताना दुसरीकडे दूध उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत असल्याने दुग्धव्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकूणच चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
आम्ही शेतकऱ्यांकडून कडबा विकत आणतो, त्यांनीच एका महिन्यात दोन वेळा भाववाढ केली आहे. त्यामुळे नाइलाजाने आम्हालाही भाववाढ करावी लागत आहे.
- शेखर मुऱ्हे, कडबा कुट्टी चालक
गेल्या दोन महिन्यात सरकि, गोळी, भुसा पेंड यात गोणीमागे जवळपास तीनशे रुपये महागले आहेत. यावर काही सरकारी नियंत्रण असले पाहिजे.
- सोमनाथ बोडके, दुध उत्पादक शेतकरी, गहुंजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.