काळेवाडी, ता. १९ : काळेवाडी परिसरातील भाजी मंडईची सुविधा उपलब्ध नसल्याने भाजी विक्रेत्यांकडून रस्त्यांच्या कडेला, पदपथ आणि चौक परिसरात दुकाने थाटली जात असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
काळेवाडीतील प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी सकाळी- सायंकाळी भाजी विक्रेत्यांची मोठी गर्दी होते. ग्राहक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून भाजी खरेदी करत असल्याने रहदारीला अडथळाही होत आहे. काही ठिकाणी रस्त्याचा मोठा भागाचा वापर निरनिराळे साहित्य, भाजी विक्री करण्यासाठी वापरला जात असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
विक्रेत्यांचीही अडचण
भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र, अधिकृत आणि मूलभूत सुविधांनी युक्त जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे, वाहतुकीची समस्या आणि माल खराब होण्याचा धोका यामुळे विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ अतिक्रमणांचा नसून नियोजनाच्या अभावाचा प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काळेवाडीत हॉकर्स झोनची अंमलबजावणी होणे बाकी असून स्थायी समितीच्या निर्णयानुसार ती करण्यात येईल. सध्या डांगे चौकाच्या आतील बीआरटीएस जागेमध्ये बसण्याची त्यांना परवानगी देण्यात आली आहे. काळेवाडी परिसरातील काही ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. त्यावरही नेहमी कारवाई होते.
- हेमंत जाधव, प्रभारी अतिक्रमण निरीक्षक ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय
काळेवाडी परिसरात मोठी लोकसंख्या आहे. मात्र, भाजीपाला खरेदी करण्यासाठी व्यवस्थित मंडई नाही. त्यामुळे रस्त्यावरच बाजार भरतो. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास होतो.
- चेतन म्हस्के, रहिवासी
भाजी विक्रेत्यांना हटविणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर नागरिकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित बाजारपेठ असावी.
- सविता डोंगरपुरे, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.