काळेवाडी, ता.७ : काळेवाडी येथील तापकीर मळा रस्त्यावर अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत उभी असलेली वाहने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने ही वाहने उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तापकीर मळा परिसरात रहिवासी व व्यावसायिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांची सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्याकडेला अनेक दिवसांपासून बेवारस वाहने धूळखात उभी आहेत. काही वाहने वापरात नसल्याचे दिसून येत असून, त्यांची देखभालही केली जात नसल्याचे चित्र आहे. बेवारस वाहनांमुळे वाहनचालकांना रस्त्याचा पूर्ण वापर करता येत नाही. समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देताना दुचाकीस्वारांची कसरत होते. रात्रीच्यावेळी अंधारात उभी असलेली वाहने लक्षात न आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित वाहनांची माहिती घेऊन वाहनमालकांना नोटिसा देणे, वाहने हटविणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून अशा वाहनांच्या मालकांना नोटिसा देऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
अनेक दिवसांपासून काही वाहने एकाच ठिकाणी उभी आहेत. ती वापरात आहेत की नाही, याची कोणालाही माहिती नाही. त्यामुळे रस्त्याची जागा विनाकारण अडवली जात आहे.
- शंतनू खरोटे, रहिवासी
या रस्त्यावरून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ असते. बेवारस वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो. प्रशासनाने अपघात होण्याची वाट न पाहता कारवाई करावी.
- सूरज खाडे, नागरिक
आमची बेवारस वाहनांवर नियमित कारवाई सुरू असून अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून अशा वाहन मालकांना नोटिसा देण्यात येतील. नागरिकांनी बेवारस वाहनांबद्दल कळवावे.
- चंद्रकांत वाबळे, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.