तळेगाव दाभाडे, ता. ११ : मावळ तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी स्फोटकांसह बंदुकीचा वापर केला जात आहे. तसेच सापळे लावून वन्यप्राण्यांच्या शिकारी केल्या जात आहेत. यामध्ये बाहेरील शिकाऱ्यांबरोबर स्थानिक नागरिकांचाही सहभाग असल्याने उरलेसुरले वन्यप्राणी या शिकाऱ्यांमुळे ‘फस्त’ होताहेत.
पवन मावळातील लोहगडाच्या परिसरात गेल्या वर्षी शिकाऱ्यांनी रानडुक्कर मारण्यासाठी ठेवलेली स्फोटके एका गाईने खाल्ली. यात तिच्या जबड्याला जबर दुखापत झाली. महागाव येथे एका श्वानासोबत असाच प्रकार घडला. यातच त्या प्राण्याने जीव सोडला. वाउंड येथे तरस शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकला. या घटना पाहता, तालुक्यातील वनाधिकारी शिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. प्रामुख्याने नाणे, आंदर व पवन मावळातील अतिदुर्गम भागांत गेल्या काही वर्षांत शिकारीचे प्रमाण वाढल्याचे वन्यजीवप्रेमी नागरिक सांगत आहेत.
या भागांत केल्या जातात शिकारी
नाणे मावळ व आंदर मावळातून नाणोली व गभालेवाडी भागांत जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. तेथे जाण्यासाठी शिकारी या दोन रस्त्यांचा वापर करतात. पठारावरील काही नागरिक शिकार करतात. थोरण, जांभवली, पाले या पट्ट्यासह शिरोता धरणाच्या आजूबाजूला शिकारी होतात. नाणे मावळातील वडिवळे धरणाच्या बॅकवॉटरला असणाऱ्या टाटा धरणाच्या हद्दीत खासगी जागांसह लोहगड, विसापूर परिसर आणि पवना जलाशयाच्या चारही बाजूंनी शिकारी होतात.
प्रशासनाने कारवाई करावी
नाणे, आंदर व पवन मावळातील वनक्षेत्रात हरीण, सांबर, रानससे, रानडुक्कर, मोर, लांडोर, सायाळ, भेकर यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. वनक्षेत्रात घट, वाढत्या शिकारी, प्राण्यांच्या तस्करी तसेच काही प्रकल्पांमुळे येथे हे प्राणी दिसणे दुर्मीळ झाले आहे. परिसरातील शिकारी रोखण्यासाठी प्रशासानाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी वन्यजीवरक्षक मावळ संस्थेने केली आहे.
वन्यजीवांच्या अधिवासावर मानवाचे अतिक्रमण
पवना डॅमच्या चारही बाजूंना, वडिवळे धरणाच्या तसेच आंदर मावळातील ठोकळवाडी धरणाच्या बाजूला असणाऱ्या डोंगरभागांत मोठ्या प्रमाणात बंगले झाले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी डोंगर पोखरून टोलेजंग बंगले झाले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संपुष्टात आला आहे.
वन प्राण्यांची शिकार केल्याने १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मावळ भागात शिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रीच्या गस्ती सुरू आहेत. त्या अजून वाढविण्यात येतील. एखाद्या भागात शिकार होत असेल किंवा झाली असेल, तर आम्हाला माहिती द्यावी. आम्ही तातडीने कठोर कारवाई करू. माहिती कळवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवू.
- प्रकाश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.