तळेगाव दाभाडे, ता.७ : मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण सोमवारी (ता.७) सायंकाळपर्यंत ७६.२२ टक्के भरले. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस सुरूच असल्याने धरणात पाण्याचा येवा सुरूच आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना नदी पात्रात कोणीही उतरू नये. नदीकाठच्या शेतीमधील अवजारे, पंप, जनावरे त्वरित सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सखल भागातील नागरिकांनाही याबाबत योग्य ती सूचना देण्यात यावी, असे पूरनियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि पाण्याच्या येव्यानुसार विसर्गाचे प्रमाण पुन्हा कमी किंवा जास्त केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.