विजय सुराणा : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. २ ः नुकत्याच संपलेल्या वर्षात मावळ तालुक्यात जमीन खरेदी-विक्री व्यवहार जोरात झाले. तीन दुय्यम निबंधक कार्यालयांत ४१ हजार १४४ दस्तांची नोंद झाली. त्यातून शासकीय तिजोरीत ५०७ कोटी २६ लाख ७८ हजार ३११ रुपये जमा झाले.
तालुक्यात लोणावळा, वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे येथे ही कार्यालये आहेत. तेथील दुय्यम निबंधक सी. एम. खांडेकर (तळेगाव दाभाडे), प्रभारी एस. एम. भुईंगळ (वडगाव मावळ) आणि बी. पी. जमदाडे (लोणावळा) यांनी ही माहिती दिली.
एक गुंठ्यापासून दोनशे एकरांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. लोणावळा, खंडाळा, पवनाधरण परिसर ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखला जातो. तेथे अभिनेते, मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. तालुक्यात विविध ठिकाणी पिंपरी चिंचवड, पुणे येथील बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्प सुरू केले आहेत.
वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वाधिक मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क जमा झाले. वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागणी कशामुळे ?
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा परिसर
- लोणावळा-खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे
- तळेगावसारख्या औद्योगिक वसाहती
- असंख्य पर्यटनस्थळे
- पवना धरण परिसर
- विविध गृहप्रकल्प
- उद्योगांना पूरक सरकारी धोरणे
- पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
---
दृष्टिक्षेपात
तळेगाव दाभाडे ः वडगाव मावळ ः लोणावळा
दस्त संख्या : १४,१५० ः १८०४७ ः ८९४७
मुद्रांक शुल्क : १८४ कोटी ३६ लाख ३ हजार ४३ ः २०६ कोटी ३२ लाख ६ हजार ५२१ ः ८३ कोटी १ लाख ६० हजार,२४०
नोंदणी शुल्क : १४ कोटी ४६ लाख १७ हजार ९४० ः १४ कोटी १३ लाख ६२ हजार ७०२ ः ४ कोटी ९७ लाख २७ हजार ७८५
एकूण महसूल : १९८ कोटी ८२ लाख २० हजार ९८३ ः २२० कोटी ४५ लाख ६९ हजार २२३ ः ८७ कोटी ९८ लाख ८८ हजार २५
---
फोटो 81916