तळेगाव दाभाडे, ता. १८ ः नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी), पुणे येथे इंटेल एआय सेंटर ऑफ एक्सलन्स व टी-हब, हैदराबाद यांच्या सहकार्याने ‘इनोव्हेटर्स हॅकाथॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन स्पर्धा २२ व २३ जानेवारी रोजी एनएमआयईटी कॅम्पसमध्ये होणार आहे. याप्रसंगी पत्रकार परिषदेला संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के, संचालक डॉ. प्रमोद पाटील, सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, एनआयसीचे सीईओ मुजाईद शेख उपस्थित होते.
दरम्यान, एनएमव्हीपीएम संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, सहसचिव विनायक अभ्यंकर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, ऍटोसचे उपाध्यक्ष माधव कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक शैलेश कुलकर्णी, असेंचर तसेच टी-हब, हैदराबाद येथील श्रीनिवास तालुका आदींची उपस्थिती लाभणार आहे.
देशभरातून २०० संघांचा सहभाग अपेक्षित असून, या हॅकाथॉनद्वारे विद्यार्थ्यांना खऱ्या जीवनातील समस्यांवर तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण उपाय मांडण्याचे व्यासपीठ मिळणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---