तळेगाव दाभाडे : उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आणि शासकीय दुखवटा संपताच मावळ तालुक्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची धामधूम ओसरताच आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे रणांगण तापले आहे. आता मतदानानंतरच कोणाची ताकद किती हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची जोरदार चर्चा आहे.
थेट लढती
तालुक्यात सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत रंगली आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे मामा-भाचे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने निवडणूक अधिकच चुरशीची ठरली आहे.
खर्चाचा आकडा कोट्यवधींत
गेल्या आठ महिन्यांपासून इच्छुकांनी बैठका, गटबांधणी, मेळावे, प्रचार साहित्य, सोशल मीडिया मोहिमा आणि कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. प्रचारासाठी लाखो ते कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खुलेआम सुरू आहे. काही इच्छुकांनी खर्च भागविण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतल्याच्याही चर्चा आहेत.
बदलला निवडणूक खर्चाचा पॅटर्न
पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तुलनेने कमी खर्चात होत असत. मात्र, गेल्या दशकात चित्र पूर्णतः बदलले आहे. तळेगाव, लोणावळा आणि वडगाव येथील अलीकडील निवडणुकांतील आर्थिक उधळणीनंतर आता त्याच धर्तीवर या निवडणुकांमध्येही खर्च झपाट्याने वाढताना दिसत आहे.
दोन लढतींकडे लक्ष
नगरपरिषद निवडणुकांनंतर वाढलेली राजकीय धुसफूस आणि शेळके-भेगडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक पूर्णतः प्रतिष्ठेची बनली आहे. ‘मामा की भाचा’ बाजी मारणार याकडे संपूर्ण मावळचे लक्ष लागले आहे. इंदोरी-वराळे आणि खडकाळा-कार्ला या दोन जिल्हा परिषद मतदारसंघांत दोन्ही पक्षांनी ताकद लावली असून, तुल्यबळ उमेदवारांमुळे येथे खरी लढत रंगताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.