तळेगाव दाभाडे, ता. २८ : पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी वडगाव येथे बांधलेले ऐतिहासिक तळे आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. या तळ्यातील सात विहिरी वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात. मात्र, दुर्लक्ष झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तळ्यासह परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
या तळ्याच्या एका बाजूला वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर, शेजारीच मशीद, जवळच महावीर भवन अशी त्रिवेणी संगमाची आणि सामाजिक एकोपा सांधणारी प्रार्थनास्थळे आहेत. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तळ्यामुळे परिसराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढते. नियमित तसेच विशेष सण-उत्सवप्रसंगी हजारो भाविक दर्शनासाठी येतात; मात्र तळ्यातील अस्वच्छता, वाढलेली दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण, ढासळलेल्या भिंती यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याच परिसरात दर गुरुवारी बाजार भरतो. त्यातील काही व्यावसायिक पालापाचोळा, कचरा याच तळ्यात टाकतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
या तळ्याच्या स्वच्छतेसाठी यापूर्वी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, पन्नालाल सुराणा आदींनी पुढाकार घेतला होता. १९६७ मध्ये ग्रामस्थ आणि तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तळ्याची साफसफाई करण्यात आली होती.
ऐतिहासिक महत्त्व
‘‘या तळ्यातील विहिरींमध्ये पूर्वी शस्त्रे ठेवली जायची. पुण्यात पेशव्यांचा दरबारात या तळ्यातील कमळाची फुले पाठवली जात होती. त्यामुळे तळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे,’’ असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
नागरिकांची अपेक्षा
‘‘आता नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक तळ्याचे जतन व सुशोभीकरण करावे. येथे उद्यान, बोटिंग क्लब सुरू करावा. तळ्यासह परिसर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा,’’ अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
देवस्थानची मागणी
‘‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून श्री पोटोबा मंदिराजवळील तलाव सुशोभीकरण व ढासळलेल्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करावी,’’ अशी मागणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास योजनेतून या ऐतिहासिक तळ्याच्या सुशोभीकरणासाठी साडेपाच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
- डाॅ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत
TDB26B04795
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.