तळेगाव दाभाडे, ता. ७ : डिजिटल युगात मोबाईल हे शिक्षणाचे प्रभावी साधन ठरत असले तरी त्याचाच अतिरेक विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम करत असल्याचे चित्र समोर येत आहे. रील्स, ऑनलाइन गेम्स आणि सोशल मीडियावरील सततचे स्क्रोलिंग यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव, विस्मरण, चिडचिडेपणा आणि निद्रानाशाच्या तक्रारी वाढत असल्याचे पालक व शिक्षकांचे निरीक्षण आहे.
गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांच्या वर्तनात लक्षणीय बदल दिसत आहेत. अभ्यासात लक्ष न लागणे, सतत मोबाइलची मागणी करणे, वेळेचे भान न राहणे तसेच उशिरापर्यंत जागरण यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम होत आहे. मोबाईल न मिळाल्यास अस्वस्थता आणि राग व्यक्त करण्याचे प्रकारही वाढल्याचे सांगितले जाते.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, स्क्रीनसमोर दीर्घकाळ घालवल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते. परिणामी सकाळी थकवा, आळस आणि अभ्यासातील अनुत्साह जाणवतो. दीर्घकालीन परिणाम म्हणून स्मरणशक्ती कमी होणे व सामाजिक संवादात अडथळे निर्माण होऊ शकतात.
काय करावे?
- आठवड्यातून एक दिवस ‘डिजिटल डिटॉक्स’ पाळावा.
- शाळा परिसरात मोबाईल वापरावर कठोर नियंत्रण ठेवावे.
- पालकांनी मुलांसमोर मोबाइलचा मर्यादित वापर करावा.
- मुलांना मैदानी खेळ, वाचन व सांस्कृतिक उपक्रमांकडे वळवावे.
- तंत्रज्ञान टाळणे शक्य नसले तरी त्याचा समतोल आणि जबाबदारीने वापर करावा.
‘‘विद्यार्थी मोबाइलचा अतिवापर करत असून, वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बौद्धिक विकासावर परिणाम दिसून येतो. पालकांनी स्वतः आदर्श ठेवत मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.’’
- डॉ. अमृता सुराणा, उपप्राचार्य, यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
मोबाइलचा अतिवापर केल्यास अभ्यासात एकाग्रता कमी होते, वेळेचा अपव्यय होतो आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियामध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे मानसिक ताणही वाढू शकतो. म्हणून मोबाइलचा वापर मर्यादित आणि योग्य कारणांसाठी केला तर तो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
- डॉ. अनिश भट, मानसोपचार तज्ज्ञ, तळेगाव दाभाडे
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.