तळेगाव दाभाडे, ता. २४ : वाढत्या उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, पाणीपुरवठा यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांची दैनंदिन पाण्याची गरज ५०० लीटरवरून थेट ८०० ते १००० लिटरपर्यंत वाढली आहे. पवना धरण, इंद्रायणी नदी तसेच स्थानिक तळ्यांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी सुमारे ४० वर्षे जुनी सोमाटणे जॅकवेल लाइन आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे वितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नळांना तोट्या बसवणे बंधनकारक केले आहे. पिण्याच्या पाण्याने गाड्या धुण्यास सक्त मनाई करण्यात आली असून जलवाहिन्यांमधील गळती तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शहरातील अनेक ‘सेकंड होम’ बंद असल्याने पाण्याच्या टाक्या भरून वाहत असून, मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. संबंधित मालकांनी टाक्यांना ‘स्टॉप व्हॉल्व्ह’ बसवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दोन वेळा सूचना देऊनही सुधारणा न झाल्यास संबंधित घरांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी तोडण्यात येईल, असा इशारा पाणीपुरवठा विभागाचे गणेश काकडे यांनी दिला. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.